मांडा- टिटवाळा येथे दहावीचे परीक्षा केंद्र सुरू करण्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परवानगी दिली आहे. छत्रपती शिक्षण मंडळाच्या विद्यामंदिरात हे परीक्षा केंद्र असणार आहे. मार्च २०१४ ची परीक्षा या केंद्रावर होणार आहे. मांडा, टिटवाळा, मोहने, आंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देण्यासाठी कल्याण परिसरात यावे लागत होते. या भागातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय टिटवाळा केंद्रामुळे टळणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने या परवानगीचे पत्र शाळा व्यवस्थापनाला पाठविले आहे. मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी गेले वर्षभर हे केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या केंद्राला १२०३ हा कोड क्रमांक देण्यात आला आहे, असे आमदार भोईर यांनी सांगितले.