देशाच्या विविध भागात जाऊन तेथील प्रकल्पांचा अभ्यास करायचा. त्या प्रकल्पांतील तंत्राचा वापर कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कसा करता येईल यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांत महापालिकेने सुमारे ११ लाखांचा चुराडा केला आहे. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्याचा एकही अहवाल महापालिकेत उपलब्ध नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
विदेशातील मलनि:स्सारण प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी महापौर वैजयंती गुजर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी सिंगापूर दौऱ्यावर गेले होते. हा खर्च नेमका कुणी केला, याविषयी महापालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या गेल्या १८ वर्षांच्या इतिहासात झाले नाहीत एवढे अभ्यासदौरे महापौर गुजर यांच्या कार्यकाळात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. विकासासाठी हा पैसा खर्च करण्यात आला असता तर या ११ लाखांतून एखादे छोटे चांगले काम उभे राहिले असते, अशी टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेतील नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवड पालिका दौरा ( ऑगस्ट २०१०)- २७ हजार, कुलू मनाली दौरा ( जून २०१०), केरळ अलपी महापालिका, चंदीगड दौरा ( डिसेंबर २०११) – खर्च ४ लाख ४८ हजार, नवी मुंबई महापालिका दौरा – १५ हजार खर्च, कुलु मनाली अभ्यास दौरा सहा लाख असे काही दौर केले आहेत. यापैकी एक दौरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे रद्द झाला. विदेशातील मलनि:स्सारण प्रकल्प पाहणी दौऱ्याची माहिती महापालिकेच्या दप्तरात उपलब्ध नाही. या दौऱ्यांचा एकही अहवाल दौऱ्यातील नगरसेवकांनी, अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सादर केलेला नाही. त्यामुळे हे अभ्यास दौरे म्हणजे पर्यटनाची मौज आणि करदात्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.