सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १० एप्रिलला विदर्भात व छत्तीसगडमधील काही भागात पार पडला. या निवडणुकीच्या प्रचारासाठी बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हेलिकॉप्टरने दौरे केले. हे दौरे करीत असताना हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करण्यात आला. हेलिकॉप्टर लॅन्डींग आणि पार्कीगपासून विमानतळाला ११ लाखांचा महसूल मिळाला. हा महसूल मार्च आणि एप्रिल २०१४ या दोन महिन्यात प्राप्त झाला.
१० एप्रिलला विदर्भात ९ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. तत्पूर्वी नेत्यांना प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. हेलिकॉप्टरचा वापर करण्यामध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व अन्य पक्षाच्या नेत्यांचा समावेश होता. यानिमित्त विविध पक्षाचे राजकीय नेते विदर्भात फिरले. हा वापर करण्यापूर्वी नागपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचे लॅन्डींग व पार्कीग करण्यात आले होते. त्याच्या मोबदल्यात विमानतळ प्राधिकरणाला बराच महसूल प्राप्त झाला. मार्च आणि एप्रिल २०१४ या दोन महिन्याच्या कालावधीत जवळपास २१२ हेलिकॉप्टरच्या फेऱ्या झाल्यात. अन्य लहान विमानांच्या ९४ फेऱ्या झाल्यात.
खासगी हेलिकॉप्टरच्या लॅन्डींगसाठी मार्च महिन्यात ६ लाख ३७ हजार ८९८ रुपये, तर पार्कीगसाठी ७९ हजार ५९४ रुपये तर सुरक्षा व्यवस्थेसाठी ४५ हजार ४६१ रुपये विमानतळाला प्राप्त झाले. तर एप्रिल महिन्यात लॅन्डींगसाठी ३ लाख १७ हजार ९७३ रुपये, पार्कीगसाठी १० लाख ८४० रुपये व सुरक्षेसाठी ३० हजार ०१५ रुपये मिळाले. या दोन महिन्यात विमानतळाला एकूण ११ लाख ०१ हजार ७३६ रुपये महसूल प्राप्त झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली काही बाबींची माहिती विमानतळ प्राधिकरणाला मागितली होती. त्यावरून ही माहिती प्राप्त झाली आहे.
१ एप्रिल २००९ ते ३१ ऑक्टोबर २०१३ या दरम्यान विमानांच्या पार्कीगपोटी १ कोटी ०५ लाख ८४ हजार ५३७ रुपये महसूल प्राप्त झाला. तर याच कालावधील खासगी चारचाकी वाहनांच्या पार्कीगपोटी विमानतळ प्राधिकरणाला प्रत्येक महिन्याला ५ लाख ६९ हजार ४८२ रुपये मिळाले. याच कालावधीमध्ये रन-वे वर किती प्राणी आले व त्यामुळे किती विमानांना अपघात झाला. त्यात किती प्राण्यांचा मृत्यू झाला याची माहितीही विचारण्यात आली होती. या प्रश्नाच्या उत्तरात रेन-वे वर एकही प्राणी आला नाही, तसेच त्यांच्यामुळे विमानाला अपघात झाला नाही, अशी माहिती देण्यात आली.