व्हाईटनरचे व्यसन करण्यास पालकांनी विरोध केल्यामुळे कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्तीतील एका बारा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.
सौरभ पोपट दहिरे (रा. काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक) असे या मुलाचे नाव आहे. सौरभचे वडील मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी सौरभ याला व्हाईटनरची नशा करण्याचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो शाळेतही जात नव्हता. त्याच्याकडून अशा प्रकारचे व्यसन केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी त्याला जोरदार विरोध केला. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी सकाळी घरात कोणी नसताना सौरभ स्वयंपाकघरात गेला. पोटमाळ्यावर ठेवलेल्या शिडीला दोर बांधला व गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी अकराच्या सुमारास सौरभचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
इलेक्ट्रिशनची आत्महत्या
नवी पेठ येथे एका इलेक्ट्रिशनने शुक्रवारी पहाटे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. संजय बाळकृष्ण डोंगरे (वय ४२, रा. नवी पेठ) असे त्यांचे नाव आहे. डोंगरे यांच्याकडे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात म्हटले आहे.