पुष्पेंद्रसिंग राज्यात सवरेत्कृष्ट छात्र
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या १७ महाराष्ट्र बटालियन नगरच्या १३ छात्रांची निवड झाली आहे. महाराष्ट्राचा सवरेत्कृष्ट छात्र म्हणून नगर महाविद्यालयाच्या पुष्पेंद्रसिंग याची निवड झाली.
हे सर्व छात्र २८ डिसेंबरला दिल्लीला रवाना झाले. आता महिनाभर त्यांची या संचलनासाठी कसून तयारी करून घेतली जाईल, तसेच देशाच्या अन्य राज्यांतून आलेल्या छात्रांशी त्यांची स्पर्धा होऊन त्यात उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्याला पंतप्रधान ध्वज प्रदान केला जाईल. सलग ३ वर्षे हा ध्वज जिंकण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे.
जिल्ह्य़ातून निवड झालेले छात्र व त्यांचे महाविद्यालय याप्रमाणे- पुष्पेंद्रसिंग, तुषार वाने, स्वप्निल बोठे (सर्व नगर महाविद्यालय), विलास दत्तात्रय जाधव (न्यू आर्टस महाविद्यालय, नगर), नंदू तराळ ( न्यू आर्टस, पारनेर), सिद्धार्थ संजय दरंदले, केतन सीताराम मोकाने (सोनई महाविद्यालय, नेवासे), अविनाश बबन भोसले, प्रशांत लाला घालमे (दादा पाटील महाविद्यालय, कर्जत), सागर भानुदास चोभे (नगर), अजित राजेंद्र काटे, प्रभाक कुंडलिक मांडे (श्रीगोंदे), भानुदास प्रभाकर खेडकर (पाथर्डी), शिवम राजकुमार कांबळे (टाकळी ढोकेश्वर, पारनेर).
राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील छात्रांच्या औरंगाबाद येथे गेले दोन महिने सुरू असलेल्या शिबिरातून राज्याचा चमू निवडण्यात आला, त्यात नगर जिल्ह्य़ातील या १३ छात्रांची निवड झाली. या शिबिरात १७ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने नगर महाविद्यालयाचे छात्रसेना प्रमुख कमांडर मेजर शाम खरात सहभागी झाले होते. जिल्ह्य़ातील छात्रांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडर कर्नल के. एस. मारवा यांनी या सर्व छात्रांचे अभिनंदन केले आहे.