स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारी येथून १५० युवक-युवती विवेकानंद ज्योती प्रज्वलित करून लातूरला आणणार असल्याची माहिती स्वामी विवेकानंद जयंती १५० वर्ष समारोह समितीचे स्वागताध्यक्ष आमदार वैजनाथ शिंदे व कार्याध्यक्ष अ‍ॅड. संजय पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूर परिसरातील १५० युवक-युवती रविवारी (दि. ६) लातूर-सोलापूरमार्गे कन्याकुमारीला जातील. दि. ९ जानेवारीला अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. मुरली मनोहर व विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे अध्यक्ष परमेश्वरन यांच्या हस्ते या ज्योतीचे प्रज्वलन होणार आहे. दि. १२ला ज्योत लातुरात येणार आहे. राजीव गांधी चौकात त्याचे स्वागत होणार आहे. नांदेड रस्त्यावरील विवेकानंद पुतळ्यापासून निघणाऱ्या शोभायात्रेत ही ज्योत सहभागी होईल.
अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. नांदेड रस्त्यावरील विवेकानंद चौकात पुतळ्याची दैनंदिन स्वच्छता व पूजन वर्षभर केले जाईल. वर्षभरात मासिक व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे. दि. ७ फेब्रुवारीला विवेक घळसासी यांच्या व्याख्यानाने प्रारंभ होणार आहे. ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, नवदाम्पत्य मेळावा, युवती मेळावा, शैक्षणिक परिषद, महिला प्रतिनिधी सक्षमीकरण या उपक्रमांबरोबरच जानेवारी २०१४मध्ये मानवी साखळी व युवक मेळाव्याने सांगता होणार आहे.
वर्षभर होणाऱ्या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष डॉ. एस. बी. सलगर, सुनील देशपांडे, संजय अयाचित, नितीन शेटे उपस्थित होते.