१२५ वर्षांपूर्वी महिला सशक्तीकरणाचा  संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातुरातील विविध क्षेत्रातील १५० महिलांनी विवेकानंदांच्या पुतळ्याला जागतिक महिला दिनानिमित्त अभिवादन केले.
अ.भा.वि.प., विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर नांदेड रस्त्यावरील विवेकानंद चौकात स्वामी विवेकानंद पुतळ्याचे नित्य पूजन हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील १५० महिलांनी अभिवादन केले. यात लातूरच्या महापौर स्मिता खानापुरे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा पाटील कव्हेकर, जि.प.च्या माजी उपाध्यक्षा अ‍ॅड. जयश्री पाटील,  पंचायत समिती सभापती मंगलप्रभा घाडगे, नगरसेविका केशरबाई महापुरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा भिसे, भारतीय स्त्री शक्तीच्या डॉ. ज्योत्स्ना कुकडे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, बँक कर्मचारी महिला संघटनेच्या अध्यक्षा अंजली पाठक, शाहू महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्मिता दगडे यांच्यासह लायनेस क्लब, विविध महिला संघटनांच्या सदस्या उपस्थित होत्या.  प्रारंभी विवेकानंद संस्कार संस्थेच्या अ‍ॅड. मीरा देवणीकर यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली.