गावातील भांडणे गावातच सुटावे, यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत आतापर्यंत विदर्भातील १६ हजार गावे तंटामुक्त झाली आहेत. या तंटामुक्त गावांमध्ये बुलढाणा, वर्धा, वाशीम, गोंदिया व भंडारा जिल्ह्य़ांतील सर्वाधिक गावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारने २००७ पासून ‘महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम’ राबवण्यास सुरुवात केली. या मोहीमेंतर्गत प्रत्येक गावात तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली. गावात दोन गटात तंटा झाल्यास समिती त्या दोन्ही गटातील नागरिकांना बोलावते. या तंटय़ाचा परिमाण काय होईल, हे त्यांना सांगितले जाते. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर समिती आपला निर्णय देते. हा निर्णय दोन्ही गटांना मान्य करावा लागतो. असे तंटे सोडविण्यासाठी गावपातळी, तालुका स्तर, जिल्हास्तर व विभागीय स्तरावर तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
या मोहिमेत कोणती गावे सहभागी होणार आहे, अशा गावांना विचारणा केली जाते. जी गावे सहभागी झाली, त्या गावातील तंटे न्यायालयात न जाता गावातच मिटविण्यात आले तर ते गाव तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात येते. एका जिल्ह्य़ातील प्रत्येक गाव एकाच वर्षी या मोहिमेत सहभागी होत नाही. या मोहिमेत एका जिल्ह्य़ातील किती गावे सहभागी झालेत आणि तंटे मिटविण्यात किती गावे यशस्वी झालेत, यावरून त्या जिल्ह्य़ाचे वर्गीकरण केले जाते. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या जिल्ह्य़ातील किती गावे सहभागी झाली आणि त्यात किती यशस्वी झाली, यावरून त्या जिल्ह्य़ाचे मूल्यमापन केले जाते. त्यावरून त्या जिल्ह्य़ाला सवरेत्कृष्ट जिल्हा म्हणून घोषित केला जातो. सवरेत्कृष्ट जिल्हा ठरण्यासाठी २५ ते ५० टक्के गावे तंटामुक्त होण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्य़ातील प्रत्येक गाव तंटामुक्त व्हावे, हा मोहिमेचा हेतू आहे.
विभागीय स्तरावरील समितीचे प्रमुख विभागीय आयुक्त असतात. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी असतात. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत विदर्भातील १२ लाख ३९ हजार तंटय़ांचे निवारण करण्यात आले असून १६ हजार गाव तंटामुक्त करण्यात आले. राज्यस्तरीय समितीने वर्ष २००८-०९ मध्ये सांगली, लातूर, गोंदिया, रत्नागिरी आणि भंडारा जिल्ह्य़ांना सर्वश्रेष्ठ जिल्हे म्हणून घोषित केले होते. त्यानंतर २००९-१० मध्ये नांदेड, पुणे, कोल्हापूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ातील बहुतांश गावांनी तंटय़ातून मुक्ती मिळवली होती. २०१०-११ मध्ये वर्धा, बुलढाणा, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्य़ांना सर्वश्रेष्ठ जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले होते. तर २०११-१२ मध्ये भंडारा, वाशीम, हिंगोली आणि बीड जिल्ह्य़ाला सर्वश्रेष्ठ जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले.