भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख संस्थापित लोकमंगल फाउंडेशनने आयोजिलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयात १७० जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या. या वेळी हजारो व-हाडी मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. सामुदायिक विवाह सोहळयाचे यंदाचे आठवे वर्ष होते.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात विवाह सोहळयासाठी खास उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर पंढरीचा राणा विठ्ठलाची भव्य मूर्ती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. किंबहुना या निमित्ताने या सामुदायिक विवाह सोहळयात जणू पंढरीच अवतरली होती. सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर लोकमंगल समूहाचे संस्थापक सुभाष देशमुख यांच्यासह गौडगावचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, मंद्रुपचे रेणूक शिवाचार्य, भाऊसाहेब महाराज, सुधाकर इंगळे महाराज, सुरेंद्रनाथ महाराज आदींच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा मोठया थाटात संपन्न झाला. या सामुदायिक विवाह सोहळयासाठी एक लाख ६५ हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला होता. याशिवाय ३५ हजार चौरस फूट आकाराचे भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले होते. तसेच भोजन कक्षासह इतर विविध विभागांसाठीही स्वतंत्र मंडपांची व्यवस्था करण्यात आली होती. वधू-वरांना पोशाख, संसारोपयोगी भांडी, मणी मंगळसूत्र, जोडवी आदी वस्तू देण्यात आल्या.
अक्षता सोहळयापूर्वी दुपारी विवाहस्थळी ‘लक्ष भोजन’ झाले. भोजनाच्या पंगती बराच वेळ चालू होत्या. मात्र त्यात कुठेही गडबड-गोंधळ न होता सर्वत्र शिस्त आणि तेवढीच प्रसन्नता दिसत होती. त्यानंतर सर्व १७० जोडप्यांची वाजत-गाजत वरात काढण्यात आली. त्यासाठी १७० ऑटोरिक्षांची व्यवस्था होती. विविध मार्गावरून वरात सायंकाळी पाचच्या सुमारास विवाह मंडपात पोहोचली.
अक्षता सोहळयाची वेळ समीप येऊ लागली, तशी हा संपूर्ण सामुदायिक विवाह सोहळा मांगल्याने आणि प्रसन्नतेने पुढे सरकत गेला. सुभाष देशमुख व रोहन देशमुख यांनी विवाह सोहळयातील सर्व वधू-वरांना ‘नांदा सौख्य भरे’ चा संदेश देत शुभेच्छा दिल्या. हिंदू जोडप्यांचे विवाह पवित्र अग्निभोवती सप्तपदी घेत पार पडले. तर मुस्लिम, ख्रिश्चन व बौध्द धर्मातील जोडप्यांचे विवाह आपापल्या धर्मपध्दतीनुसार झाले. यात मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील प्रत्येकी दोन जोडपे विवाहबध्द झाले. अक्षता सोहळा संपन्न होताच शोभेच्या दारूकामाची भव्य आतषबाजी करण्यात आली. तोफांची सलामीही देण्यात आली. या वेळी नेत्रदीपक विद्युत रोषणाईने संपूर्ण विवाहस्थळाचा परिसर उजळून निघाला होता.
या सामुदायिक विवाह सोहळयाच्या निमित्ताने विवाहानंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळींशी कसे समरस व्हावे, तसेच आरोग्यविषयक जागरूकता, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सुधा कांगरिया (नगर), पुण्याच्या यशदा संस्थेचे समन्वयक गणेश शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरिवद जोशी व लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी खासदार सुभाष देशमुख यांनी समुदपदेशनासाठी विचार मांडले. या वेळी सर्व वधू-वरांनी आपल्या भावी वैवाहिक जीवनात एकमेकास साथ देण्याची, सामाजिक जाणिवेने जबाबदारीने वागण्याची सामूहिक शपथ घेतली.
या सामुदायिक विवाह सोहळयासाठी सोलापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष शहाजी पवार, माजी अध्यक्ष शंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार अरिवद जोशी, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, अविनाश महागावकर, विजय जाधव, अण्णासाहेब कोतली, अंजली चौगुले, विद्या शिंदे, प्रशांत बडवे आदींची उपस्थिती होती. लोकमंगलच्या मागील सात वर्षांतील सामूहिक विवाह सोहळयात १५६१ जोडपी विवाहबध्द झाली आहेत.