सोलापूर शहर व परिसरात पडत असलेल्या पावसाचे दोन बळी गेल्याची घटना शहराजवळ कुंभारी येथे घडली. यात दोन बालकांचा जीव गेला. वळसंग पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.
अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दहा हजार महिला विडी कामगारांसाठी उभारलेल्या कॉ. गोदूताई परूळेकर घरकुलात, या घरकुल संस्थेच्या कार्यालयाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी खोलवर खड्डे खणले गेले आहेत. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या आर्द्रा नक्षत्राच्या पावसाचे पाणी बांधकामाच्या ठिकाणी खड्डय़ात साचले आहे. याच परिसरात राहणारी दोन चिमुकली मुले खेळत खेळत बांधकामाच्या ठिकाणी गेली. खेळताना पाणी साचलेल्या खड्डय़ात पडल्याने दोघा मुलांना जीव गमावावा लागला. अल्तमास सर्फराज पटेल (वय ६) व राकेश रवी मादगुंडी (वय ७) अशी दोघा मृत मुलांची नावे आहेत. ही मुले काल मंगळवारी सायंकाळी गायब झाली होती. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता रात्री त्यांचा शोध लागला नव्हता. परंतु बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याच्या डबक्यात तरंगताना आढळून आली.
यातील मृत राकेश हा सहा महिन्यांचा असतानाच त्याचे आई-वडील वारले होते. त्यामुळे त्याचा सांभाळ त्याची आत्या करीत होती. दरम्यान, या दुर्घटनेनंतर विडी घरकुल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कॉ. गोदूताई परूळेकर विडी घरकुल संस्थेच्या वतीने दोन्ही मृत बालकांच्या वारसदारांना तातडीने प्रत्येकी दहा हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.