इचलकरंजी परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. नवनीत सुभाष मगदूम (वय २९ रा.इंदिरा कॉलनी) व अमोल रामगोंड पाटील (वय २५ रा.परिट गल्ली, कबनूर) अशी मृतांची नावे आहेत. तसेच, इचलकरंजीच्या आयजीएम इस्पितळात नातेवाइकांना पाहण्यासाठी आलेल्या भोज (ता.चिकोडी) येथील संतोष अप्पासाहेब सुतार या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रदीप गोविंद फडके (वय २८ रा.कबनूर) व अविनाश बाळासाहेब कोरवी (वय २५ रा.जवाहरनगर) अशी जखमींची नावे आहेत.
    रविवारी दुपारी अमोल पाटील हा स्प्लेंडर मोटारसायकलवरून इचलकरंजीहून कबनूरच्या दिशेने निघाला होता. मॉडर्न हायस्कूलजवळ त्याच्या दुचाकीस मागून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली.
टेम्पोखाली सापडून पाटील जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. दरम्यान कोरोची येथील तीन विहिरीनजीक ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील नवनीत मगदूम हा जागीच ठार झाला. तर त्याचा सहकारी प्रदीप फडके व अविनाश कोरवी हे जखमी झाले. हा अपघात  शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. हे तिघे जण टीव्हीएस मोटारसायकलवरून जात होते. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.