मानवी वस्तीतून पकडल्यानंतर बिबळय़ांची रवानगी व्हायची ती थेट छोटय़ाशा पिंजऱ्यात. एरवी ज्याला पाहूनच सारे दबकतात, तोच रुबाबदार बिबळय़ा पिंजऱ्यात केविलवाणा व्हायचा. बिबळय़ांना मोठय़ा जागेत ठेवण्यासाठी सहा वर्षांपूर्वी सुरू झालेले बचाव केंद्राचे काम आता संपत आले असून जानेवारी महिन्यापासून पिंजऱ्यातून बिबळय़ांची सुटका होत असून नवीन वर्षांत पिंजऱ्यात गुदमरत असलेल्या २० बिबळय़ांना मोकळा श्वास घेता येणार आहे.
मानवी वस्तीत प्रवेश केलेल्या बिबळ्यांना जेरबंद करून नेमके कुठे नेले जाते याबद्दल सामान्यांना उत्सुकता असते. या बिबळ्यांना सुरुवातीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील िपजऱ्यात ठेवण्यात येते. त्यानंतर काही दिवसात त्यांच्या वागण्यातील बदल (बीहेव्हिअर पॅटर्न) पाहून ते पुन्हा जंगलात सोडण्यास योग्य आहेत असे वाटल्यास त्यांना जंगलाच्या दुसऱ्या भागात किंवा इतर जंगलात सोडण्यात येते. मात्र काही बिबळे हे अतिआक्रमक असल्याने जंगलात सोडण्यास धोकादायक वाटल्यास किंवा बिबळय़ा आजारी पडल्यास त्यांना िपजऱ्यातच ठेवले जाते.
त्याचप्रमाणे काही वेळा जंगलात एकटे सापडलेल्या बिबळ्याच्या पिल्लांनाही आणले जाते. बिबळ्याच्या पिल्लांना त्यांची आई शिकार करण्यास शिकवते. त्यामुळे िपजऱ्यात वाढलेल्या पिल्लांना शिकार करता येत नाही. असे बिबळे जंगलात टिकाव धरू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. त्यांनाही बचाव केंद्रात ठेवणे क्रमप्राप्त ठरते.
पकडलेल्या किंवा सापडलेल्या वन्यप्राण्यांना िपजऱ्यात ठेवण्यासाठी काही नियम करण्यात आलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्राण्याला किमान १२५ चौरस फुटांचा परिसर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अशा प्रकारचे बचाव केंद्र नव्हते. सध्या व्याघ्र सफारी, सिंह सफारी येथील दोन इमारतींमध्ये िपजऱ्यात बिबळे ठेवण्यात आले आहेत. अवघ्या ८० चौरस फुटांपेक्षाही कमी जागा असलेल्या या िपजऱ्यात त्यांना हालचालींसाठी पुरेशी जागाच उपलब्ध नाही. या िपजऱ्यांमध्ये सध्या २० बिबळे असून त्यातील दहा ते बारा बिबळे हे २००४-०५ या काळात पकडण्यात आलेले आहेत.
बिबळ्यांसाठी बचाव केंद्र उभारण्याची कल्पना २००५ मध्ये पुढे आली. मात्र विविध विभागांची परवानगी, निधीची कमतरता यामुळे केंद्र उभारण्यास विलंब झाला. राष्ट्रीय उद्यानातील ‘मॅफ्को फॅक्टरी’ परिसरातील एक एकर परिसरात आता हे बचाव केंद्र उभे राहिले आहे. आता केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून नवीन वर्षांच्या सुरुवातीला या केंद्रात बिबळय़ांची रवानगी होऊ शकेल. या केंद्रात बिबळय़ांसाठी १७५ चौरस फुटांची २२ निवासस्थाने आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंजऱ्यात राहिल्याने या बिबळ्यांची नसíगक शैलीच हरपली आहे. सतत एकाच जागी कोंडले गेल्यामुळे त्यांची वर्तणूक बदलून जाते. त्यामुळे त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देणाऱ्या केंद्राची आवश्यकता होती. आता हे केंद्र सुरू होत आहे ही आश्वासक बाब आहे, असे वन्यजीव संरक्षक कार्यकत्रे आणि ‘सिटी फॉरेस्ट इनिशिएटिव्ह’चे संस्थापक कृष्णा तिवारी यांनी सांगितले.