मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये फेरीवाले, टपरीधारकांच्या अतिक्रमणांमुळे प्रवासी मेटाकुटीस आले असताना कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान असलेल्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये अनधिकृत हमालांचे प्रस्थ वाढत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, एवढय़ा मोठय़ा वर्दळीच्या या मार्गावरील स्थानकांत मिळून अवघे २०८ अधिकृत हमाल कार्यरत असून काही स्थानकांत हमालच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानकात एखादी व्यक्ती जखमी झाली तर या हमालांनी त्या व्यक्तीस रुग्ण वाहिकेपर्यंत पोहोचवावे, असे अपेक्षित असताना हमालच नसल्याने रेल्वे पोलिसांनाच ही कामगिरी पार पाडावी लागत आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिन्स ते कर्जत आणि कसारा पर्यंतच्या स्थानकांमध्ये केवळ २०८ हमाल असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनन्स, दादर, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनन्स आणि पनवेल स्थानकांचा समावेश आहे. तर अन्य स्थानकांमध्ये अधिकृत हमालांची नियुक्ती नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी विचारलेल्या प्रश्नावरून ही माहिती रेल्वेकडून उपलब्ध झाली आहे.  घाटकोपर स्थानकामध्ये मागील वर्षी घडलेल्या मोनिका मोरे या तरुणीच्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर अपघातग्रस्तांना रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या दुर्लक्षित वागणुकीला वाचा फुटली होती. यावरून रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई करून अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येक स्थानकात २४ तास रुग्णवाहिका सेवा पुरवावी तसेच अपघातग्रस्तांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘सुवर्ण काळ’(गोल्डन अवर्स) मध्ये तात्काळ वैद्यकीय मदत पुरवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशामुळे राज्य शासनाने प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिकांची सोय करून देण्याचा प्रयत्न केला असला तरी अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवणाऱ्या हमालांची संख्या मात्र तुटपुंजी असल्याची तक्रार पोलिसांकडून केली जात आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने हमालांची अधिकृत संख्या २०८ दिली असली तरी मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर सुमारे पाच हजारांच्या आसपास हमाल आहेत, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे हे सगळे हमाला अनधिकृत आहेत का, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे.