स्वस्त व सुरक्षित प्रवास देऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने मानसरोवर ते खांदेश्वर रेल्वेस्थानकांच्या जोड प्रवासातून जानेवारीत सुमारे २१ लाख रुपयांची कमाई केली. जानेवारी महिन्यात या किफायतशीर प्रवासाचा सुमारे ४ लाख ९ हजार प्रवाशांनी लाभ घेतला. एनएमएमटी प्रशासनाने स्वत:च्या तिजोरीसह प्रवाशांच्या फायद्याची ही बससेवा नवीन पनवेल, पनवेल शहर व नावडे नोड येथे लवकर सुरू करावी, अशी मागणी कफ या संस्थेने केली आहे.
पोलिसांच्या पाठिंब्यामुळे ही बससेवा एनएमएमटी कामोठे नोडमध्ये सुरू करू शकली. त्याला प्रवासी संघातर्फे कफचा व प्रसारमाध्यमांचा पाठिंबा मिळाल्याने या बससेवेला विरोध करणाऱ्यांनी सरतेशेवटी प्रवाशांची बाजू घेतल्याचे चित्र आज कामोठे येथे आहे. सध्या मानसरोवर स्थानकातून रोडपाली व खांदेश्वर स्थानक अशा बससेवा सुरू आहेत. ही बससेवा सकाळी व सायंकाळी चाकरमानी कार्यालयात जाताना व घरी परतताना लोकलच्या वेळेनुसार असावी अशी मागणी प्रवाशांची आहे.
सध्या दर १५ मिनिटांनी सुटणाऱ्या बससेवेमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. तीन आसनी रिक्षांपेक्षा निम्याने स्वस्त प्रवास असल्याने प्रवाशांना बस सुटण्याची वाट पाहावी लागते. ५६ क्रमांकाच्या बससेवेचा सर्वात जास्त फायदा एमजीएम रुग्णालय व कामोठे थांब्यावरून सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना झाला. यामुळे येथील प्रवाशांना खारघर स्थानकात जाऊन लोकलमध्ये बसण्यासाठी आसन मिळत नव्हते. या बससेवेमुळे ७ रुपयांत लोकल गाठता येते तसेच खारघर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीही टाळता येते.  

पुढील मार्गावर बससेवेची मागणी
’    पनवेल स्थानक ते     व्हाया कफनगर साईनगर
’     खांदेश्वर रेल्वेस्थानक ते व्हाया खांदा कॉलनी ते आदई सर्कल ते नवीन पनवेल     नोडवरून पनवेल रेल्वेस्थानक (पूर्व)
’    नावडे नोड ते मानसरोवर स्थानक
’    पनवेल स्थानक ते टपाल नाका