२३ वर्षांपूर्वी एका कॅन्सरग्रस्त रुग्णावर न केलेल्या शस्त्रक्रियेनंतरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवल्यामुळे शिक्षा झालेले ७९ वर्षांचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल देसाई हे गेली २३ वर्षे कायदेशीर लढा देत असून आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत येऊन पोहोचली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. काहीही चूक नसताना विनाकारण शिक्षा भोगावी लागल्याचे आपले ठाम मत असून त्याविरुद्धचीच ही लढाई असल्याचे डॉ. देसाई यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. टाटा मेमोरिअल इस्पितळाचे माजी संचालक तसेच बॉम्बे इस्पितळाचे मानद सर्जन डॉ. देसाई यांच्याविरुद्ध १९८९ मध्ये जयपूरमधील निवृत्त सनदी अधिकारी पी. सी. संघी यांनी खटला दाखल केला होता. कॅन्सरग्रस्त पत्नी लीला ही डॉ. देसाई यांच्या निष्काळजीपणामुळे मरण पावली, असा त्यांचा दावा होता. परंतु हा दावा डॉ. देसाई यांनी सपशेल फेटाळला होता. त्यामुळे संघी यांनी सुरुवातीला मेडिकल कौन्सिलमध्ये तक्रार दाखल केली. मेडिकल कौन्सिलने डॉ. देसाई यांना इशारा देत दोषी ठरविले. या प्रकरणी संघी यांनी फौजदारी न्यायालयातही खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल २०११ मध्ये जाहीर झाला आणि डॉ. देसाई यांना निष्काळजीपणाबद्दल दोषी ठरविण्यात आले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले. मात्र १४ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने अपील फेटाळले. या अपीलविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा डॉ. देसाई यांना देण्यात आली होती. मात्र विहित मुदतीत म्हणजे १९ नोव्हेंबपर्यंत डॉ. देसाई यांना सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता आले नाही. त्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेनुसार ५० हजार रुपये दंड म्हणून जमा केला तसेच न्यायालयाने त्यांना कोर्ट संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा दिली. आपला न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असल्यामुळेच हा पर्याय स्वीकारला. आपण इतकी वर्षे रीतसर मार्गाने लढाई करीत आहोत. त्यात नक्कीच यशस्वी होऊ. तसे न झाल्यास यापुढे कोणताही ख्यातनाम डॉक्टर केवळ सल्ला देण्याच्या भानगडीत पडणार नाही, असेही डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.    
काय आहे प्रकरण?
लीला संघी यांना कॅन्सर असल्याचे निदान १९७७ मध्ये झाले. त्यांचे गर्भाशय काढण्यासाठी १९८७ मध्ये त्यांना न्यूयॉर्क येथे नेण्यात आले. परंतु शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे मत तेथील डॉक्टरांनी नोंदविले. त्यावेळी बॉम्बे इस्पितळात डॉ. देसाई यांच्या युनिटअंतर्गत तत्कालीन डॉ. ए. के. मुखर्जी यांनी लीला यांना दाखल केले. डॉ. मुखर्जी यांनी शस्त्रक्रिया केली. परंतु कॅन्सर सर्वत्र पसरल्यामुळे शस्त्रक्रियेचा फायदा नाही, असे डॉ. मुखर्जी यांनी डॉ. देसाई यांच्या निदर्शनास आणले आणि त्यांनी मग शस्त्रकिया न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १९८९ मध्ये लीला यांचा मृत्यू झाला. परंतु डॉ. देसाई यांनी शस्त्रक्रिया न केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला, असा आरोप संघी यांनी करीत खटला दाखल केला. वास्तविक लीला यांना डॉ. मुखर्जी यांनी इस्पितळात दाखल केले होते. आपण केवळ युनिट प्रमुख होतो. युनिट प्रमुखाच्या अखत्यारीत दाखल करून घेण्याची इस्पितळाचे धोरण होते. (जे या प्रकरणानंतर बदलण्यात आले.) आपण शस्त्रक्रिया करू, असे कधीच म्हटले नव्हते. किंबहुना डॉ. मुखर्जी यांनीच शस्रक्रिया केली. आपण फक्त सल्ला दिला, असे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.