‘श्री दत्त शेतकरी सह. साखर कारखान्याच्या ऊसउत्पादकांना एकरकमी दोन हजार पाचशे रुपये पहिली उचल देण्यात येणार आहे. चालू गळीत हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सभासदांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन कारखान्याच्या प्रगतीला हातभार लावावा,’ असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आ. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी केले.
श्री दत्त साखर कारखान्याच्या ४१व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी आ. डॉ. पाटील बोलत होते.
‘दत्त’चे सभासद प्रकाश हक्किरे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून चालू गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला, तर काटापूजन संचालक गणपतराव पाटील, युसूफ मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ऊसदरप्रश्नी पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू होते. चर्चेनंतर दोन हजार पाचशे रुपये दर देण्याचे ठरवून निर्णय घेण्यात आला.
तत्पूर्वी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि शेट्टी यांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले. गळीत हंगामात ११ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.दत्तच्या व्यवस्थापनावर सभासद व कामगारांचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चालू गळीत हंगामातील एकरकमी पहिली उचल दोन हजार पाचशे रुपये सभासदांच्या खात्यावर १३ दिवसांत जमा केली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.
आमदार प्रकाश हक्किरे भाषणात म्हणाले, कारखान्याकडे कधी आमदार म्हणून येत नाही, तर एक सभासद म्हणून येतो. गेली पंचवीस वर्षे माझा व कर्नाटकातील सभासदांचे जिव्हाळय़ाचे नाते आहे. कारखान्याच्या पारदर्शी कारभारामुळे ‘दत्त’ने कर्नाटकातील सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे ‘दत्त’शिवाय कुठेही दुसरीकडे ऊस गाळपास जाणार नाही, असे सांगून त्यांनी ‘दत्त’चे अध्यक्ष डॉ. सा. रे. पाटील यांनी दोन हजार पाचशे रुपये दर दिले व राजू शेट्टी यांनी सहमती दिल्याबद्दल अभिनंदन केले.
चंदूर टेक ते सैनिक टाकळीदरम्यान १२ कोटी रुपयांचा पूल बांधण्याची निविदा आजच जाहीर होणार आहे. असे सांगताच उपस्थित कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासदांनी या कामाचे टाळय़ा वाजवून स्वागत केले.
स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार आ. डॉ. पाटील यांनी केले. आभार रावसाहेब भोसले यांनी मानले.