काळविटाची शिकार करणाऱ्या कोल्हापूरच्या तिघा तरुणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास अटक केली. मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे झालेल्या या कारवाईत या तिघाजणांकडून जीपमध्ये शिकार करून आणलेली दोन नर जातीची काळविटे हस्तगत करण्यात आली. मात्र या शिकारींपैकी दोघेजण रायफल व काडतुसांसह पळून जाण्यात यशस्वी ठरले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
मोहोळ तालुक्यातील वाघोली-वटवटे रस्त्यावर कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक सायकर व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना त्यांची सरकारी जीप पाहून समोरून येणारी महिंद्रा जीप (एमएच ०९-सीएम १३२) जागीच थांबली. संशय आल्याने पोलिसांनीही ही जीप तपासली असता त्यात नुकतेच शिकार केलेली दोन काळविटे आढळून आले. जीपमध्ये बसलेल्या तरुणांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी जीपमधील दोघाजणांनी अंधाराचा फायदा घेऊन रायफल व काडतुसांसह पळ काढला. तेव्हा सावध झालेल्या पोलिसांनी धाक दाखवत तिघाजणांना ताब्यात घेतले. यात विक्रम राजाराम पाटील (रा. राजारामपुरी, कोल्हापूर), माधव यादव (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) व रणजित यादव (रा. कोल्हापूर) अशी या तिघांची नावे आहेत. तर पळून गेलेल्या दोघा तरुणांची नावे सर्जेराव पाटील (रा. कोल्हापूर) व मन्सूर शेख (रा. वाघोली, ता. मोहोळ) अशी असल्याचे समजले. तथापि, पोलिसांना जीपमध्ये एका रायफलसह काही काडतुसे सापडल्याचे सांगण्यात आले. या सर्वाविरुद्ध वन्यप्राणी संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.