सोलापुरात एकाच दिवशी आगीच्या तीन दुर्घटना; ३० लाखांची हानी

सोलापूर शहरात बुधवारी पहाटे शिवछत्रपती रंगभवनानजीकच्या लाकडी फर्निचरच्या गोदामाला, तर नंतर थोडय़ाच वेळात शेळगी येथे जोडमिलला, तर दुपारी सात रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण कक्षाला आग लागली. यात सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. या तिन्ही आगीच्या घटना शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे सांगण्यात आले.

मध्यरात्री उशिरा शिवछत्रपती रंगभवनाजवळच्या कब्रस्तानाच्या जागेत थाटलेल्या लाकडी फर्निचरच्या गोदामाला अचानकपणे आग लागली आणि क्षणार्धात या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत फर्निचरच्या गोदामासह लगतच्या चार दुकानांनाही आगीची मोठी झळ बसली. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या १५ बंबांचा वापर करून आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत सुमारे १० लाखांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
ही आग आटोक्यात येते न येते, तोच हैदराबाद रस्त्यालगत शेळगी येथे मेहताबनगरात परमशेट्टी यांच्या जोडमिलला आगीने लपेटले. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत धान्याचा भुसा, जोडगहू, यंत्रसामग्री, मोटार असा सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशामक दलाने सुमारे १५ पाण्याचे बंब वापरून सकाळी ही आग नियंत्रणात आणली. या दोन आगीच्या दुर्घटना होत नाहीत तोच सात रस्ता परिसरातील हॉटेल त्रिपुरसुंदरीजवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण व संशोधन कक्षाला आग लागली. यात रासायनिक यंत्रसामग्रीसह संपूर्ण कक्ष आगीत भस्मसात झाला. अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3 burning disaster in a day in solapur loss of 30 lakh

ताज्या बातम्या