जिल्हा परिषदेतील दलित वस्ती निधीवाटपाचा वाद निवळतो न निवळतो, तोच आता तीर्थक्षेत्र विकास योजनेची कामे कोणत्या यंत्रणेने मंजुरी करायची यावरून सत्ताधाऱ्यांत वादाला तोंड फुटले आहे. मात्र, त्यामुळे नियोजनाचे काम रखडले आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जि. प. त शिवसेनेची एक हाती सत्ता असताना सुरुवातीपासूनच अंतर्गत दोन गट झाल्याने अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांना जि. प. चे कामकाज चालविणे डोकेदुखी बनली आहे. विकासनिधी वाटपावरून सत्ताधारी गटातील वाद अनेकदा चव्हाटय़ावर आले. दलित वस्ती निधीवाटपाचा वाद निवळतो न निवळतो तोच आता तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी सुमारे २ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. नियमावर बोट ठेवीत सत्ताधाऱ्यांनी दीडपट निधीच्या म्हणजे ३ कोटीच्या कामाचे नियोजन केले आहे.
यात जटाशंकर मंदिर डोंगरकडा (१५ लाख), भवानी मंदिर वारंगाफाटा, कृष्णमंदिर जडगाव (२० लाख), निळकंठेश्वर महादेव मंदिर सेंदूरसना, अमृतेश्वर महादेव मंदिर उमरा (१९ लाख), बौद्धविहार इंचा (१४ लाख), पंचमुखी महादेव संस्थान सावा, संत दुधाधारी महाराज संस्थान, रुपूर (प्रत्येकी १२ लाख), संत तुकाराम महाराज संस्थान, येहळेगाव तुकाराम, तुळजाभवानी मंदिर, पुसेगाव, माझोडदेवी मंदिर, माझोड, बेलेश्वर मंदिर, रिधोरा (प्रत्येकी ४ लाख), महादेव मंदिर, कृष्णापूर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शेवाळा (१० लाख), रेणुकामाता व दत्तमंदिर, डोंगरगाव पूल (९ लाख), खटकाळी हनुमान संस्था, मालवाडी, दत्तमंदिर, रेणापूर (प्रत्येकी ५ लाख), महादेव मंदिर, चिंचोली, तुळजाभवानी मंदिर, घोटादेवी, बाळसखा महाराज मंदिर, पांगरी, बालाजी मंदिर, पुरजळ (प्रत्येकी ३ लाख), उत्तरेश्वर महादेव मंदिर, थोरावा, महादेव मंदिर, िपपळा चौरे, हटकेश्वर मंदिर, हट्टा, पुलारीआई मंदिर, कुरुंदा, मिश्कीनशाह दर्गा, जवळा बाजार आदी निधीवाटपाचा समावेश आहे.
मात्र, सत्ताधारी गटात तीर्थक्षेत्र योजनेतील कामांना बांधकाम विभागाची मंजुरी घ्यायची की, पंचायत समिती विभागाकडून यावरून वादाला तोंड फुटले आहे. सत्ताधारी गटातील काही पदाधिकारी ही मंजुरी बांधकामकडून घ्यावी, यासाठी पुढाकार घेत आहेत, तर दुसरा गट पंचायत समितीकडून मंजुरीसाठी आग्रही आहे. मंजुरीचा हा वाद जिल्हा नियोजन समितीच्या बठकीतही गाजला. त्यावर निर्णय घेण्यात आला होता. आता या वादाला तोंड फुटल्यामुळे संबंधित अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले असल्याने तीर्थक्षेत्र कामाचे नियोजन आजमितीला तरी स्थगित ठेवण्यात आले आहे.