उपराजधानीसह विदर्भातील विविध जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात पतंगाची बाजारपेठ असून मकरसंक्रातीच्या निमित्ताने विदर्भात गेल्या दोन दिवसात दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची असल्याची माहिती पतंग व्यावसायिकांनी दिली. संक्रातीच्या आधी दहा दिवस आणि त्यानंतर २६ जानेवारीपर्यंत संक्रातीचे वातावरण असते. या काळात एकटय़ा नागपुरात दीड ते दोन कोटीची पतंग आणि इतर साहित्याची खरेदी होत असल्याचे पतंग विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पतंगाचे भाव वाढले असले तरी विक्री मात्र कमी झालेली नाही.
वर्षभर आकाशात न दिसणाऱ्या पतंग डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हमखास दिसू लागतात. वर्षभर हा व्यवसाय करणारे अनेकजण नागपुरात असून ते साठा करून ठेवतात. विदर्भात अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि अकोला या भागात पतंगाची बाजारपेठ आहे. बेरोजगार मुले संक्रातीच्या दिवसात घरच्या घरी पतंगाचे साहित्य आणून ते तयार करतात. शहरातील पंतगाची बाजारपेठ वेगवेगळ्या आकारातील पंतग आणि मांजानी सजल्या आहेत. नागपुरात बाबुळखेडा, बेझनबाग, तांडापेठ, हसनबाग, जुनी शुक्रवारी या भागात मोठय़ा प्रमाणात पतंग तयार करण्याचे कारखाने असून वर्षभर ते हाच उद्योग करीत असतात. जुनी शुक्रवारी आणि इतवारी भागात पतंग आणि मांजाची बाजारपेठ असून गेल्या दोन दिवसात या दोन्ही ठिकाणी युवकांची इतकी गर्दी होती की, दुकानात पतंगाचा असलेला साठा कमी पडला. यवतमाळ, अमरावतीला पतंग तयार करण्याचे कारखाने आहेत.
 शहरातील काही पतंग तयार करणाऱ्या कारखान्याला भेटी दिल्या असता बाबुळखेडा भागातील कैलास पाटील या व्यावसायिकाने सांगितले, हा व्यवसाय पिढीजात असून वर्षभर तो करीत असतो. साधारण दिवाळीनंतर या कामाला गती मिळत असते. माझ्याकडे चार कामगार असून शिवाय, परिवारातील लोक मदत करतात. वर्षांला किमान वेगवेगळ्या आकारातील एक लाखावर पतंग तयार करतो. आमच्याकडील माल केवळ नागपुरातच नाही, तर विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्येही जातो. ही एक कला आहे. एक मोठी पतंग तयार करण्यासाठी साधारणत १५ ते २० मिनिटे लागतात. नागपुरात पतंगांची मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी कोटय़ावधी रुपयाची उलाढाल होते. आमच्याकडून ठोक विक्री करणाऱ्यांकडे माल जातो. चिल्लर विक्री आम्ही करीत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. पूर्वी गुजरात आणि मध्यप्रदेशातून पतंग विक्रीला येत असत. मात्र, स्थानिक लोक या व्यवसायाकडे वळल्यामुळे बाहेरून माल येणे बंद झाले आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात नागपुरातूनच पतंग विक्रीसाठी जात असतात.
पतंगासोबत मांजाची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. पूर्वी घरोघरी मांजा तयार केला जात असे. मात्र, बाजारात रेडिमेड मांजा भरलेली चक्री विकत मिळत असल्यामुळे अनेक युवक तेच खरेदी करतात. ही विक्री या दिवसात कोटय़वधीच्या घरात होते. बाजारात अग्नी, सकल आठ, महासकल आठ, एके ५६, गेंडा, हातोडा, कलिंगडा, संखल, अशा नावाचे मांजे विक्रीला आहेत. दुकानांमधील फिरक्यावर चमकणारे लाल, गुलाबी, निळा, पिवळा, असे विविध रंग सर्वांना आकर्षित करीत आहेत. जुनी शुक्रवारीतील बाजारपेठेत संपर्क साधला असता अनिल जैस या विक्रेत्याने सांगितले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मांजाच्या किमतीत वाढ झाली आहे. मांजा भरलेल्या चक्रीला यंदा मोठी मागणी आहे. वेगवेगळ्या कंपनीचा दोरा असलेले रीळ घेऊन वस्त्या वस्त्यात मांजा तयार करण्याचे प्रमाण कमी झाले असून मांजामध्ये ४० पेक्षा अधिक प्रकार आहे. साधारणत एका चकरीत ५ ते ६ रीळ मांजा असून ३०० ते ३५० रुपयाला त्याची विक्री केली जाते. बरेली आणि संखलच्या मांजाचा दर्जा चांगला असल्यामुळे तो महाग आहे. संखलमध्ये चार तारपासून बारा तारापर्यंत मांजा विक्रीला आहे.