तब्बल तीन लाख वारक ऱ्यांच्या उपस्थितीत पंढरीत आज माघी यात्रेचा सोहळा रंगला. वारक ऱ्यांच्या मोठय़ा उपस्थितीने दर्शन रांग गोपाळपूर पुणे रोडपर्यंत गेली होती. दुष्काळ, महागाई याच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या माघी यात्रेला वारक ऱ्यांची उपस्थिती लक्षणीय मानली जात आहे.
माघी यात्रेनिमित्त गेल्या दोन दिवसांपासूनच शहरात वारकरी दाखल होऊ लागले होते. काल दोन लाख वारकरी दाखल झाले होते. आज ही संख्या तीन लाखांच्या वर गेली. टाळमृदंगाचा नाद आणि मुखी ज्ञानबा-तुकारामाच्या गजराने आज सकाळी अवघी पंढरी दुमदुमून गेली. चंद्रभागेच्या वाळवंटात हजारो भाविकांच्या राहुटय़ा पडल्या होत्या. या राहुटय़ा-तंबूमधून अभंग, भजन, प्रवचनाचे कार्यक्रम सर्वत्र रंगले होते.
दुष्काळ, महागाईच्या पाश्र्वभूमीवरही झालेल्या मोठय़ा गर्दीने दर्शन रांग गोपाळपूर पुणे रोडपर्यंत गेली होती. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाला १० ते १२ तास रांगेत थांबावे लागत होते. याशिवाय मुखदर्शनाचीही सोय केली होती. ही रांग तुलनेने लवकर पुढे सरकत होती. या वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था बजावली होती.