सोलापूरजवळ केंद्रीय सुरक्षा दलाच्या तीन प्रशिक्षण केंद्रांची उभारणी होणार

केंद्रीय राखीव पोलीस दलासह सीमा सुरक्षा दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र सोलापुरात उभारण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाठपुरावा चालविला आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलासह सीमा सुरक्षा दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र सोलापुरात उभारण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाठपुरावा चालविला असून त्या अनुषंगाने त्यांनी सोलापुरात सोमवारी सकाळी उच्चस्तरीय बैठकीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी व मुस्ती तसेच अक्कलकोटजवळील हन्नूर येथील जागा संपादन करण्यावर शिक्कामोर्तब केले.
शासकीय विश्रामगृहात आयोजिलेल्या या बैठकीस शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहसचिव अमित कौशिक तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक राजीव, पुणे विभागाचे मुख्य वन संरक्षक जीतसिंह, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, निवासी उपजिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अमृत नाटेकर आदी उपस्थित होते.
या तिन्ही केंद्रीय सुरक्षा दलांच्या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी प्रत्येकी सुमारे १२५ एकर खासगी जागा संपादन करावी लागणार आहे. मुस्ती येथे केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण उभारण्याचा प्रस्ताव आहे तर हन्नूर येथे सीमा सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्र आणि टाकळी येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी मुस्ती येथे शंभर एकर जागा उपलब्ध असून यात काही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. ही जागा वापरण्यास जिल्हा परिषदेची तयारी असल्याचे सांगण्यात आले. तर हन्नूर व टाकळी येथे प्रत्येकी ४०.६५ हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊन जागा संपादन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 3 training centres of crpf will raise near solapur

ताज्या बातम्या