शहरातील एटीएम मशिन फोडण्याच्या प्रयत्नात अटक केलेल्या चौघांपैकी एका अट्टल चोराने चोरीचे सोने दोन सराफांकडे गहाण ठेवून मोठी रक्कम घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अक्षय चव्हाण असे या चोरटय़ाचे नाव असून त्याने दिलेल्या माहितीनुसार या दोघा सराफांकडून चोरीच्या ४० तोळे सोन्यापैकी ३४ तोळे सोने जप्त करण्यात आले.
या सराफांकडे आणखी कोणी चोरीचे सोने गहाण ठेवून वा विकून पैसे घेतले आहेत काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.
शहरामधील एका एटीएम मशिन फोडण्याच्या प्रयत्नातील चौघा आरोपींना पोलिसांनी गेल्या २ फेब्रुवारीला अटक केली. त्यांना दि. ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. यातील एक आरोपी अल्पवयीन असून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर अन्य तिघांची पोलीस कोठडी १४ पर्यंत वाढविली.
या दरम्यान पोलिसांनी या आरोपींकडे केलेल्या तपासात अक्षय चव्हाण या आरोपीने शहर व परिसरात सोन्याचे दागिने चोरून सराफांकडे गहाण ठेवून पैसे घेतले असल्याची बाब उजेडात आली. सिडको पोलिसांनी चव्हाणने दिलेल्या माहितीच्या आधारे दोघा सराफांकडून चोरीचे ३४ तोळे सोने हस्तगत केले. हे सोने गहाण ठेवून साडेसहा लाख रुपये रक्कम चव्हाणने घेतल्याचे तपासात उघड झाले. आपल्या आईचे दागिने आहेत.
घराच्या कामासाठी पैसे पाहिजे असल्याचे सांगून सराफांकडून पैसे घेतल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कटके यांनी सांगितले.