वादळी वाऱ्यासह पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे करमाळा तालुक्यातील सातोली येथे घरांवरील छप्परे उडून गेल्याने ३५ कुटुंबे बेघर झाली आहेत. घरातील धान्य व संसारोपयोगी सामानांचे नुकसान झाले असून वाहनांचेही नुकसान झाले आहे. काही जुने वृक्ष उन्मळून कोसळले आहेत. या आस्मानी संकटामुळे सातोलीचे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकीकडे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा मिळून सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या असताना सातोली येथे मात्र वादळी वाऱ्याने व पावसाने तब्बल ३५ परिवारांचे संसार उघडय़ावर आणले. वासुदेव साळुंखे यांच्या घराच्या छतावरील ३० पन्हाळी पत्रे उडून गेले. तर महादेव साळुंखे यांच्या घरातील दहा पोती ज्वारी व खत भिजल्याने नुकसान झाले. रमेश साळुंखे यांच्या अंगावर छतावरील लाकूड पडल्याने ते जखमी झाले.
घरांच्या नुकसानीबरोबर केळीच्या बागांची हानी झाली. गावच्या शिवारात किमान २५ विजेचे खांब उन्मळून कोसळले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अगोदरच दुष्काळाने त्रस्त असताना त्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे सातोलीच्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.