८० लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून भामटय़ांनी ३८ लाखाने फसविल्याची घटना बालाजीनगरात घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महेंद्र रामनवाज पांडे (रा. बालाजीनगर) यांना त्यांच्या मोबाईलवर १८ मे रोजी सकाळी अकरा वाजता एक कॉल आला. ‘तुम्हाला ८० लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे महेंद्र पांडे हरखून गेले. आरोपीने त्यानंतर बऱ्याचवेळा संपर्क साधून वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात रक्कम भरण्यास सांगितले. असे एकूण ३८ लाख ५०० रुपये पांडे यांनी भरले.
त्यानंतरही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने त्यांना शंका आली. प्रत्येकवेळी भामटय़ाने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला होता. त्यावर पुन्हा संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने पांडे भानावर आले. त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. दरम्यान, लॉटरी लागल्याचे, बक्षीस लागल्याचे संदेश आला किंवा फोन आला तरी नागरिकांनी त्या आमिषास बळी न पडता तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.