‘तिकीट खिडकीसमोर खूप गर्दी आहे, गेल्या अनेक दिवसांत तिकीट तपासनीस दिसतच नाहीत. विनातिकीट प्रवास केल्यास कुठे बिघडले. रेल्वेकडे तिकीट तपासनीसांची वानवा तर आहे..’, असे कोणतेही विचार करून विनातिकीट प्रवास करण्याचे धाडस करणार असाल, तर सांभाळून राहा! येत्या काळात मध्य रेल्वे आपल्या तिकीट तपासनीसांच्या ताफ्यात ३८५ जणांची भरती करणार आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेवरील तिकीट तपासणी कारवाई अधिक सक्षमपणे होईल.
गेल्या आर्थिक वर्षांत मध्य रेल्वेने विनातिकीट किंवा बेकायदेशीर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. तरीही मध्य रेल्वेवरील तिकीट तपासनीस विभागात मंजूर पदांपेक्षा पाचशेहून अधिक पदे रिक्त आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १४०४ तिकीट तपासनीसांच्या जागा आहेत. यापैकी १०५२ जागा भरलेल्या आहेत. यापैकी फक्त ४७० तिकीट तपासनीस उपनगरीय स्थानकांसाठी काम करतात. उर्वरित तिकीट तपासनीस लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये कार्यरत असतात. ही संख्या मंजूर संख्येपेक्षा खूपच कमी आहे.मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांना  
चाप लावण्यासाठी गेल्या  वर्षभरापासून जोरदार मोहीम राबवली आहे. तसेच त्यासाठी उपनगरीय क्षेत्रात कार्यरत तिकीट तपासनीसांना दर दिवशी १५०० रुपये आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांतील तिकीट तपासनीसांना प्रतिदिन ३००० रुपये एवढे लक्ष्यही आखून दिले आहे. मात्र मुळातच तिकीट तपासनीसांची संख्या कमी असल्याने आणि त्यातही उन्हाळी सुटीचा हंगाम लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या जादा गाडय़ांमध्ये तिकीट तपासनीसांची नियुक्ती केल्याने उपनगरीय गाडय़ांमध्ये आणि स्थानकांत काळा कोट घातलेले हे तिकीट तपासनीस अभावानेच आढळतात.
मात्र यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वे तातडीने रेल्वे भरती मंडळातून (रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड) ३८५ तिकीट तपासनीस भरती करून घेणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आर. डी. शर्मा यांनी स्पष्ट केले. या तिकीट तपासनीसांची भरती झाल्यावर त्यांना ७० दिवस प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच हे तपासनीस कामावर आणि पर्यायाने स्थानकांत किंवा गाडीत रुजू होतील. त्यामुळे पुढील काही दिवसांतच फुकटय़ा प्रवाशांना चांगलाच चाप लागणार आहे.