आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत लुटारूंनी आता नवनवीन क्लुप्त्यांचा वापर सुरू केला आहे. मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव धांदे येथील व्यक्तीला चेन्नई येथील कथित सनशाईन कंपनीच्या प्रतिनिधींनी २ लाख ७० हजार रुपयांनी गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका जाहिरातीच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकात जाहिरात प्रकाशित झाली होती. चेन्नई येथील सनशाईन टॉवर कंपनीला जागा पाहिजे, भरीव मोबदला दिला जाईल, अशा आशयाची ती जाहिरात होती. बोरगाव धांदे येथील वसंत उकंडराव डोंगरे (४५) यांच्याकडे गावाजवळच जागा असल्याने त्यांनी जाहिरात वाचून या कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. जागेच्या मोबदल्यात एका व्यक्तीला नोकरी आणि १ कोटी १० लाख रुपये मिळतील, असे आमीष या कंपनीच्या एका प्रतिनिधीने वसंत डोंगरे यांना दाखवले.
संपर्कात असलेल्या लुटारूंपैकी एका जणाने आपले नाव राज शर्मा असल्याचे सांगितले. एकूण पाच जणांनी वसंत डोंगरे यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ५ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ लाख ६९ हजार ८०० रुपये उकळले. जागेच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळणार असल्याने आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळणार असल्याने वसंत डोंगरे हे त्यावेळी आनंदात होते.
पण, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. जागा हस्तांतरितही झाली नाही आणि जागेची रक्कमही मिळाली नाही. अनेक दिवस त्यांनी वाट पाहिली आणि या घटनेची तक्रार मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी राज शर्मा आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
सनशाईन मोबाईल कंपनी ही मोबाईलसाठी टॉवर उभारण्याचे काम करीत असल्याचे सांगण्यात आले होते. टॉवर उभारण्यासाठी जागा मागण्याच्या बहाण्याने या कंपनीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता पोलिसांनी या कंपनीचा शोध सुरू केला आहे. यापूर्वी बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याशिवाय, मोबाईलवर संपर्क साधून लॉटरी लागल्याची बतावणी करणाऱ्या लुटारूंची संख्याही वाढली आहे. बक्षीस लागल्याच्या मोहात अनेक व्यक्ती अडकतात आणि या लुटारूंच्या फसवणुकीला बळी पडतात, असे दिसून आले आहे. काही आरोपींकडून मोबाईलवर एटीएमचा पासवर्ड विचारून आर्थिक फसवणुकीच्या घटनाही अलीकडच्या काळात उघड झाल्या आहेत.