पाण्याचे मीटर ४०० रूपयांना उपलब्ध होत असतांना तेच मीटर इचलकरंजी नगरपरिषदेकडून १ हजार रूपयांपर्यंत ग्राहकांच्या गळ्यात मारले जात आहे. शहरामध्ये सुमारे २ हजार नळ कनेकशन चोरून घेतलेली असून त्यांच्या शोध घेऊन दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगांवकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.    
१८ किलोमीटरवरून आणलेल्या कृष्णा नळपाणी योजनेत अनेक त्रुटी आहेत. योजना सदोष असल्याने पालिकेने अद्याप त्याचा ताबा घेतलेला नाही. या योजनेतील सर्व दोष निदर्शनास येण्यासाठी पाण्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. नगरपालिका दरवर्षी पाणी बिल १२०० रूपये आकारत आहे. पण दुसरीकडे दोन हजार नळ कनेकशन चोरून घेतलेली असून त्याचा फटका प्रामाणिक करदात्यांना बसत आहे. पाण्याच्या मीटरमध्येही अनेक दोष आहेत. मीटरची सक्ती होण्यामागचे नेमके रहस्य शोधण्याची गरज आहे.
नगरपालिकेने ३५ टक्के जादा दराने मीटर्स आणून ठेवलेली आहेत. मीटर पुरवठा करणाऱ्या एजंटला विक्रीकर चुकविल्याने १४ लाख रूपयांचा दंड झाला आहे. तर मीटरला जादा दर लावल्याने २००८ साली खरेदी केलेल्या मीटरमध्ये नागरिकांना २८ लाख रूपयांचा फटका बसणार आहे. नगरपालिकेची पाणीयोजना भ्रष्टाचारमुक्त चालण्याची गरज आहे, असे पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर प्रसाद दामले, अनिल सातपुते, शिवजी व्यास, संतोष हत्तीकर, संतोष खडके, शशिकांत कालेकर, इराण्णा सिंहासने आदींच्या सह्य़ा आहेत.