परभणी जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यात करण्यात आल्या. जिल्ह्यातून चार अधिकारी बाहेर बदलून जात असताना त्यांच्या जागी केवळ तीन अधिकारी जिल्ह्यात येत आहेत. परभणी शहर उपविभागीय अधिकाऱ्याची जागा यापूर्वीच रिक्त आहे. त्यामुळे काही काळ जिल्ह्यातील सहापैकी दोन जागा रिक्तच राहणार आहेत.
जिल्ह्यात परभणी शहर, परभणी ग्रामीण, जिंतुर, सेलू, गंगाखेड व पूर्णा येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. सहा महिन्यांपूर्वीच परभणी शहराचे उपविभागीय अधिकारी संदीप डोईफोडे यांची बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. परभणी ग्रामीणचे अरिवद माखणीकर यांच्याकडे परभणी शहराचा अतिरिक्त कारभार होता. शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील ३९ पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यात परभणीतील ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
परभणी ग्रामीणचे माखणीकर यांची फलटण (सातारा) येथे बदली झाली. त्यांच्या जागी लता पाटलोबा फड या महिला अधिकारी येत आहेत. गंगाखेडचे एन. डी. गोरे यांची अहमदपूर (लातूर) येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर दौंड येथून शंकर हनुमंत केंगार येत आहेत. सेलूचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत अलसटवार यांची किनवट (नांदेड) येथे बदली झाली. त्यांच्या जागी सोलापूरहून चत्रभुज राघोबा रोडे येत आहेत. जिंतूरचे प्रशांत बच्छाव यांची बदली जळगाव येथे झाली. परंतु या जागेवर कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. साहजिकच परभणी शहर व जिंतूरचे पद काही काळ रिक्त राहणार आहे.