जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयामार्फत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्य़ांतील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम मार्च २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक रोड येथील चांडक-बिटको महाविद्यालयात आयोजित ‘विभागीय शिकाऊ उमेदवारी भरती’ मेळाव्यात सुमारे ४०० जणांनी सहभाग घेतला.
व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एन. यु. गांगुर्डे, उद्योजक धनंजय बेळे, साहाय्यक संचालक बी. आर. शिंपले, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, बोर्ड ऑफ अप्रेंटिंसचे साहाय्यक संचालक डी. व्ही. देशमुख, वंदना वानखेडे, पी. व्ही. पाटील, शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. जी. सोनार आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी स्वागत केले. एन. यु. गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. उद्योजकांनी रोजगार संधीबद्दल माहिती दिली. बी. व्ही. देशमुख यांनी विद्यार्थी व शिक्षकांना आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी कुशल तांत्रिक ज्ञान देऊन सक्षम विद्यार्थी घडविणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिंपले यांनी काळानुरूप व्यवसाय अभ्यासक्रमात बदल होत असून विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्याचे आवाहन केले. उद्योजक धनंजय बेळे यांनी येणाऱ्या काळात नाशिकच्या उद्योग क्षेत्रात अनेक नवनवीन प्रकल्प येऊ घातले असल्याने कुशल मनुष्यबळाची गरज लागणार असल्याचे नमूद केले. वंदना वानखेडे यांनी उद्योजक होण्यासाठी आवश्यक कर्जपुरवठा तसेच उद्योग व सेवाक्षेत्रासाठी आवश्यक बाबींविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. जयंत भाभे यांनी केले. आभार प्रा. ए. बी. भिडे यांनी मानले. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.