शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची असलेली कमतरता दूर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे मेडिकल कौन्सिलच्या निरीक्षणानंतर लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढणार आहेत.
देशातील १० वर्ष जुने सर्व शासकीय व मान्यता प्राप्त खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी ५० अतिरिक्त जागा वाढविण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालय (मेडिकलमध्ये) सध्या २०० ‘एमबीबीएस’ च्या जागा आहेत. आता या जागांमध्ये ५० जागा वाढणार आहे. शासनाने वाढीव जागांना मंजुरी दिली असून वैद्यकीय महाविद्यालयांना भारतीय वैद्यक परिषदेकडे निवेदन सादर करावे लागणार आहे. निवेदनावर विचार करून संबंधित महाविद्यालयात जाऊन ‘एमसीआय’ची चमू निरीक्षण करणार आहे.
ज्या वैद्यकीय महाविद्यालयात ५० जागा असतील त्या ठिकाणी आणखी ५० जागांसाठी मान्यता मिळणार आहे. मेडिकल कॉलेजशी संबंधित ‘एमसीआय’ नियमाच्या संशोधनानंतर हा प्रस्ताव लागू होईल. त्यानंतर एमसीआयची चमू महाविद्यालयात जाऊन आरोग्य सुविधा आणि मूलभूत व्यवस्थेचे निरीक्षण करेल. देशात ३६२ वैद्यकीय महाविद्यालये असून एकूण ४५ हजारांवर एमबीबीएसच्या जागा आहेत. यापैकी अधिक जागांवर प्रवेशासाठी प्रथमच ‘सीबीएससी’ राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी सांगितले, मेडिकलमध्ये डॉक्टरांची करतरता असल्याने रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामाची दखल घेऊन तीन महिन्यांपूर्वीच शासनाकडे वाढीव जागाचा प्रस्ताव पाठविला आहे. जागा वाढणार असतील तर खाटा वाढविणे, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था इत्यादी बाबींची पूर्तता शासनाला करावी लागणार आहे. जागा वाढल्यास रुग्णसेवा अधिक चांगली देता येईल. एमसीआयची चमू लवकरच मेडिकलमध्ये येऊन निरीक्षण करणार आहे आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असेही डॉ. पोवार म्हणाले.