रेल्वेमार्गावरील गुन्ह्य़ांवर वचक ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी २०१४ मध्ये तब्बल ६७ हजार लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १.७८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईतील विशेष बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या डब्यांमध्ये भीक मागत फिरणाऱ्या भिकाऱ्यांकडून तब्बल ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने १८ हजारांहून अधिक भिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. मात्र भिकाऱ्यांच्या मागे लागलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना मद्याच्या धुंदीत गाडीतून प्रवास करणारे साडेतीन हजार प्रवासीही वर्षभरात सापडलेले नाहीत.
मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने जानेवारी ते २८ डिसेंबर २०१४ या कालावधीत रेल्वेमार्गावर विनातिकीट प्रवास, रेल्वेरूळ ओलांडणे, छतावरून प्रवास करणे, तिकीट दलाली, महिला किंवा अपंग यांच्या डब्यातून प्रवास करणे आदी गुन्ह्य़ांखाली तब्बल ६६,८०९ प्रवाशांवर कारवाई केली. २०१३ या वर्षांत याच कालावधीत ६५,९५१ जणांवर कारवाई झाली होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८५० पेक्षा जास्त गुन्हेगारांवर कारवाई करण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे २०१३मध्ये या गुन्हेगारांकडून वसूल केलेली दंडात्मक रक्कम १ कोटी ५८ लाख एवढी होती. यंदा मात्र या दंडाच्या रकमेत २० लाखांनी वाढ झाली आहे. यंदा ही रक्कम १.७८ कोटी एवढी प्रचंड आहे.
* दंड वसूलीच्या रकमेपैकी बहुतांश वाटा हा भिकाऱ्यांच्या कटोऱ्यातून आला आहे. २०१४ या वर्षांत रेल्वे सुरक्षा दलाने डब्यांत भीक मागत फिरणाऱ्या १८,३६० भिकाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७० लाख ४७ हजार एवढी मोठी रक्कम वसूल केली आहे. मात्र याच काळात मद्यपान किंवा नशाबाजी करून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांपैकी फक्त ३३४७ प्रवाशांवर कारवाई करणे सुरक्षा दलाला शक्य झाले आहे. या प्रवाशांकडून सहा लाखांपेक्षाही जास्त दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरक्षित डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३१ हजार प्रवाशांकडून ५७ लाख रुपये दंडापोटी जमा करण्यात आले आहेत.
* मुंबईतील महिला सुरक्षा लक्षात घेता महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या चार हजारांपेक्षा जास्त टग्यांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. यांपैकी काहींना तुरुंगाची हवा खायला लागली असून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्यात आला.
* रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ५९०० लोकांकडून तब्बल दहा लाखांची दंडवसुली झाली आहे. त्याशिवाय विनाकारण गाडय़ांतील साखळी ओढून गाडय़ा थांबवण्याच्या गुन्ह्य़ाखाली ५६१ लोकांकडून साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे.