‘नेमीनाथ जैन फाऊंडेशन’चा जीवनदायी प्रकल्प!
मूत्रपिंड विकाराचे (किडनी) रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईतील डायलिसिस केंद्रांची संख्या अपुरी पडत आहे. त्यातच डायलिसिसचा हजार दोन हजारांचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. अशा हजारो रुग्णांसाठी  मालाड येथील ‘श्री नेमीनाथ जैन फाऊंडेशन’चे डायलिसिस प्रकल्प जीवनदायी बनले आहेत. गेले एक तप संस्थेच्या माध्यमातून हजारो किडनी रुग्णांना अवघ्या शंभर ते दोनशे रुपयांमध्ये डायलिसिस करण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी महापालिकेच्या कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात नेमीनाथ जैन फाऊंडेशनच्यावतीने सातवे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येत आहे.
मधुमेह व उच्च रक्तदाब तसेच चुकीची औषधयोजना यामुळे प्रामुख्याने किडनी निकामी होते. अशा रुग्णांना आठवडय़ातून किमान तीनवेळा डायलिसिस करणे आवश्यक असते. यासाठी महिन्याला किमान तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो. औषधांचा खर्च वेगळाच. या पाश्र्वभूमीवर नेमीनाथ जैन फाऊंडेशनचे निरूप कोठारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक तपापूर्वी डायलिसिस मशीन रुग्णालयांना देऊन अवघ्या शंभर रुपयांमध्ये ही सेवा सुरू केली. एक तपाच्या कालावधीत दहिसर ते विलेपार्ले येथे डायलिसिस सेंटर स्थापन करून १६६ यंत्रांद्वारे शंभर ते दोनशे रुपयांत हजारो रुग्णांना ही सेवा देण्यात येत आहे.
नेमीनाथमधील बिपीन संघवी, अरविंद राठोड, बाबूभाई जैन, जयंत जैन, महेंद्रभाई, शैलेश शहा आणि गिरीश पटेल आदी अनेक कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने काम करत असल्यामुळेच किडनी रुग्णांप्रमाणेच कॅन्सर व हृदयरुग्णांनाही आम्ही भरीव मदत करू शकतो, असे निरूप कोठारी यांनी संगितले. अर्थात अशा कामाला निधी लागतो.अनेक दानशूर मंडळी आम्हाला सढळ हस्ते मदत करतात. यामध्ये घेसुलाल राठोड, बख्तावर रांका, कनकराज लोढा आणि सतीशभाई मेहता यांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी मिळत असते, असेही कोठारी यांनी आवर्जून सांगितले. डायलिसिस हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून येत्या २२ नोव्हेंबर रोजी डॉ. आंबेडकर रुग्णालयात भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सात मशीन असलेल्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महापालिका व सार्वजनिक संस्था यांच्या सहकार्यातूनडायलिसिस सेंटर सुरू करण्यात अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच मुंबईत आज पालिका व खाजगी सहभागातून दहाहून अधिक डायलिसिस सेंटर सुरू झाल्याचे निरुप कोठारी यांनी सांगितले.

प्रामुख्याने वृद्धांना होणारी गुडघेदुखी आणि त्यापायी करावी लागणारी ‘नी-रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया याकडे सध्या संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. ४ महिन्यांत १०२ रुग्णांची अशी शस्त्रक्रिया करून देण्यात आली आहे. याशिवाय शीव येथील किकाबाई रुग्णालयात अवघ्या २५ ते ५० हजार रुपयांमध्ये सुमारे ८०० हून अधिक रुग्णांची हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी रुग्ण दारिद्रय़ रेषेखालील असावा एवढीच अट आहे. त्याचप्रमाणे शेकडो रुग्णांचे एमआरआय व सीटीस्क ॅन नेमीनाथच्या वतीने अत्यल्प दरात अथवा मोफत काढून दिले जातात. कॅन्सर रुग्णांना लागणारी औषधे, विशेषकरून केमोथेरपीची महागडी इंजेक्शन्स फाऊंडेशनच्यावतीने मोफत उपलब्ध करून देण्यात येतात.