मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, तर कुणाच्या मुलाला प्राण गमवावे लागले. अनेकांचे छत्रच हरपले. देशातील या पहिल्या बॉम्बस्फोट मालिकेमुळे आर्थिक राजधानीचे थोडेथोडके नव्हे, तर सुमारे २७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र खटल्यात दोषी ठरलेल्या आरोपींकडून राज्य सरकारच्या तिजोरीत दंडरुपाने केवळ ४७.८२ लाख रुपये जमा झाले.मुंबई बॉम्बस्फोटाचा प्रत्यक्ष खटला १२३ आरोपींविरुद्ध चालिवण्यात आला. त्यातील २३ आरोपींची विशेष टाडा न्यायालयाने निर्दोष सुटका केली, तर अभिनेता संजय दत्तसह १०० आरोपींना विविध आरोपांखाली दोषी धरून शिक्षा सुनावली. दोषी ठरलेल्या १०० पकी ६८ आरोपींना कमीत कमी शिक्षा झाली आणि न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या दंडाची रक्कम भरून ते तुरुंगातून बाहेर पडले. तर ज्या आरोपींना फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, त्यांनी अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरलेली नाही. आरोपीला किती दंड ठोठावायचा की माफ करायचा याचा निर्णय घेण्याचा विशेषाधिकार संबंधित न्यायालय आणि संबंधित न्यायाधीशाला आहे. अनेक वेळा आरोपीची आर्थिक बाजू लक्षात घेऊन दंडाची रक्कम सुनावली जाते. आरोपीला शिक्षा सुनावण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या युक्तिवादानंतर न्यायालय दंडाची रक्कम निश्चित करते. न्यायालयाला वाटले की आरोपीची आर्थिक परिस्थिती हालाखीची असेल आणि त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी दिलेली शिक्षाही कमी करता येत नसेल, तर न्यायालय दंडाची रक्कम कमी करू शकते. टाडा न्यायालयाने ९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यात १०० पकी १२ आरोपींना फाशीची, तर २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. खटला चालेपर्यंत जे आरोपी तुरुंगात होते आणि न्यायालयाने सुनावलेली शिक्षा त्यांनी खटला सुरू असतानाच भोगली होती, ते आरोपी दंडाची रक्कम भरून खटल्यानंतर लगेचच बाहेर पडले. खटल्यातील एक आरोपी एहतेशाम सिद्दीकी याला टाडा न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा व ५० हजारांचा दंड सुनावला होता. परंतु खटला चालेपर्यंतच त्याने शिक्षेचा हा काळ तुरुंगात काढला. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो दंडाची रक्कम भरून बाहेर पडला.