सांगली शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव

सांगलीच्या शैक्षणिक इतिहासात मानाचे स्थान पटकाविणा-या सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होत असून शताब्दी वर्षांनिमित्त प्रजासत्ताकदिनी संस्थेचे विद्यार्थी लेझीमचा विश्वविक्रम नोंदविणार आहेत

सांगलीच्या शैक्षणिक इतिहासात मानाचे स्थान पटकाविणा-या सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होत असून शताब्दी वर्षांनिमित्त प्रजासत्ताकदिनी संस्थेचे विद्यार्थी लेझीमचा विश्वविक्रम नोंदविणार आहेत. शताब्दी वर्षांनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यांनी पत्रकार बठकीत दिली.
शताब्दीमहोत्सव उद्घाटनाचा हा कार्यक्रमास दाजीकाका गाडगीळ, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणात होत असून क्रीडांगणाची तयारी सुरू आहे.
 दि. १ रोजी गुणवंत शिक्षक व सेवकांना पुरस्कार, सेवानिवृत्तांचा सत्कार, गुणी विद्यार्थ्यांचा गौरव आणि संस्थेच्या ‘तुषार’ या वार्षकि अंकाचे केशराव दीक्षित गौरव व्याख्यान-मालेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या डॉ. गौरी माहुलीकर यांचे ‘ज्ञानभाषा संस्कृत’ या विषयावर आणि दि. ३ डिसेंबर रोजी ‘संस्कृतचा अन्य भाषांवरील प्रभाव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मार्च २०१३ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत संस्कृत विषयात प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणा-या तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पध्रेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शताब्दी वर्षांनिमित्त  दि. २८ व २९ डिसेंबर रोजी मराठी पाठय़ पुस्तकातील लेखकांचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे उद्घाटन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘पाठय़पुस्तकातील संतवाङ्मय’ या विषयावर अभ्यंकर यांचे व्याख्यान होणार आहे. हे संमेलन सांगली, तासगाव, विटा या ठिकाणी एकाच वेळी संपन्न होणार आहे. मात्र उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम येथेच होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने लेखक व विद्यार्थी यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागे असल्याचे श्री. खाडिलकर यांनी सांगितले.
अनेक सेवाव्रती सहकार्याच्या परस्पर सहकार्याने आणि लोकाश्रयाने १०० वर्षांची वाटचाल समृद्ध आणि वृिद्धगत झाली. शताब्दीमहोत्सव मातृसेवा भावनेतून साजरा करून भविष्यातील शैक्षणिक अपेक्षांसाठी सर्वतोपरी सिद्ध व्हावे, असा संकल्प आम्ही केला आहे. शाळा शिक्षकांच्या श्रमातून आणि विद्यार्थ्यांच्या यशातून मोठय़ा होतात, नामवंत होतात. एक विद्यार्थी आणि चार शिक्षक अशा स्थितीतून आज ३४ शाळा, ४०० शिक्षक अणि २० हजार विद्यार्थी असा संस्था विस्तार झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  दि. २६ जानेवारी २०१४ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ८.३० वाजता विश्वविक्रमी लेझीम प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या नोंदीसाठी गिनिज बुकशी संपर्क साधण्यात आला आहे.  संस्थेच्या विविध शाळांमधील ७५०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याच ठिकाणी एकत्रित ध्वजवंदन आणि समूहगीत सादर होणार आहे. या वेळी क्रिकेटपटू राहुल द्रविड, चेतन चौहान, राजू भावसार, गणेश शेट्टी यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू उपस्थित राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणून सांगली शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. महापालिका शाळांचा दर्जा वाढावा या दृष्टिकोनातून आम्ही दोन शाळा मागितल्या होत्या. पण मनपा त्यास तयार नाही, असेही खाडिलकर म्हणाले. या वेळी उपाध्यक्ष जनार्दन लिमये, संचालक शशिकांत देशपांडे, विजय भिडे, श्रीराम कुलकर्णी, प्राची गोडबोले उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A centenary of sangli education

ताज्या बातम्या