गुढीपाडवा आणि श्रीखंड असे समीकरण असले तरीसुद्धा गेल्या काही वर्षांत पारंपरिक श्रीखंडाबरोबरच अन्य गोड पदार्थ आणि मिठाईला चांगली मागणी आहे. त्यामुळे पाडव्याच्या गोडव्यात या मिठाईची भर पडली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरातील विविध मिठाईच्या दुकानांमधून तयार श्रीखंड, चक्का आणि मिठाई तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
दिवाळीच्या सुमारास मावा आणि खवा हा मोठय़ा प्रमाणात मुंबई तसेच महाराष्ट्राबाहेरील अन्य राज्यांतून येतो. गुढीपाडव्यासाठी मात्र प्रामुख्याने श्रीखंडाला मागणी असल्याने तयार श्रीखंड किंवा चक्का हा मुंबईतील मिठाईचे व्यापारीच येथेच मोठय़ा प्रमाणात तयार करतात. गुढीपाडव्यासाठी बाजारात आज आम्रखंडापासून केशर, केशर-वेलची, सीताफळ, मिक्स फ्रूट असे श्रीखंडाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. खवय्यांकडून श्रीखंडाला मोठय़ा प्रमाणात मागणीही असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून श्रीखंडाबरोबरच उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात येथील प्रसिद्ध असलेल्या मिठाईच्या विविध प्रकारांनाही चांगली मागणी असल्याचे काही व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
 गुढीपाडवा हा सण आता फक्त महाराष्ट्रीय मंडळींपुरता मर्यादित राहिलेला नाही. मुंबईतील अन्य भाषकही हा सण साजरा करतात. त्यामुळे महाराष्ट्रीय आणि अन्य भाषक मंडळींकडून श्रीखंडाबरोबर मलई पेढा, केशरी पेढा, काजू बर्फी, मलई बर्फी, चॉकलेट बर्फीसह गुलाबजाम, कालाजामून, अंगूर बासुंदी, बासुंदी, रबडी, रसमलाई, मालपुवा, म्हैसुरपाक, बालुशाही, बुंदी/मोतीचुराचे लाडू, जिलबी, इमरती या पदार्थानाही पसंती मिळाली असल्याचे मुंबई मिष्टान्न मंडळ या संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले.
त्यामुळे पारंपरिक श्रीखंडाऐवजी काही घरांमधून या गोड पदार्थानी गुढीपाडव्याच्या दिवशी जेवणात जागा पटकाविली असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे.