scorecardresearch

आमिर उवाच!

‘आमिर खान’ एक यशस्वी अभिनेता, निर्माता, चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्धीपासून मार्केटिंगपर्यंतची सगळी गणितं जाणणारा जाणकार..

‘आमिर खान’ एक यशस्वी अभिनेता, निर्माता, चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्धीपासून मार्केटिंगपर्यंतची सगळी गणितं जाणणारा जाणकार.. त्याच्याबाबतीत ‘मि. परफेक्शनिस्ट’, ‘संवेदनशील’ आणि ‘विचारी’ अभिनेता अशी अनेक विशेषणं लावता येतील, पण चित्रपटांच्या रुळलेल्या वाटेवरून त्याने छोटय़ा पडद्यावर ‘सत्यमेव जयते’सारखा देशातील सामाजिक समस्यांना प्रकाशझोतात आणणारा शो केला आणि त्याची प्रतिमाच बदलून गेली आहे. या शोच्या निमित्ताने कुपोषण असेल, गर्भलिंग निदान चाचण्या असतील अशा विविध विषयांवर थेट संसदेपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यामुळे त्याच्यातील अभिनेत्यापेक्षाही तो एखाद्या सामाजिक चळवळीचा अध्वर्यू आहे, अशी काही तरी प्रतिमा त्याच्याविषयी तयार झाली आहे आणि म्हणूनच ‘धूम ३’च्या निमित्ताने गप्पा मारतानाही त्याच्या चित्रपटांपेक्षा या देशात भ्रष्टाचारापासून ते बलात्कारापर्यंत ज्या घटना होत आहेत, त्यावर त्याचे भाष्य काय आहे हे जाणून घेण्यात प्रत्येकाला रस आहे. आमिरच्या गप्पांचे हे कोलाज..

भीतीसोबत जगणे सोडले पाहिजे..
सध्या देशात बलात्कार आणि लैंगिक शोषणांच्या घटनांचे जे मोहोळ उठले आहे, त्याच्यावर भाष्य करताना आमिर आपल्या चुकीच्या विचारसरणीला जबाबदार धरतो. आपण या घटना ऐकतो तेव्हा काय विचार करतो, मुलीने कपडे कुठे घातले होते, ती तिथे एकटी गेली होती का.. काय गरज आहे तिला तिथे एकटी जायची. असं नसतं. आपल्याकडे पुरुषांना जे स्वातंत्र्य आहे, तेच महिलांनाही आहे. बलात्कार होईल म्हणून त्यांनी अमुक एक कपडे घालायचे नाहीत हे र्निबध असताच कामा नयेत. त्यांनाही मन आहे. त्यांचीही स्वप्नं आहेत, इच्छा आहेत. त्यांना हवे तसे कपडे घालता आले पाहिजेत, वाट्टेल तिथे फिरता आलं पाहिजे. मुलींनी काय कपडे घातलेत याने काहीही फरक पडत नाही. मध्य प्रदेशमध्ये एक संशोधन झालं होतं, त्यात बलात्काराच्या ज्या घटना होत्या त्यातल्या ४५ टक्के महिलांनी कुर्ता-पायजमा घातला होता, ४५ टक्के महिला साडीत होत्या, तर काही १२ ते १३ टक्के मुली या शाळेच्या गणवेशात होत्या. त्यामुळे महिलांकडे बघण्याचा आपला, समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे आणि तो असा एका रात्रीत बदलणारा नाही. ती एक मोठी सामाजिक प्रक्रिया आहे. बलात्कारी माणसाच्या मनात बदल कधी होणार, याचा विचार करायचा झाला तर मुळातच प्रत्येकाच्या मनात स्त्रीविषयी आदर निर्माण करणे ही गरज असली पाहिजे. आपल्या देशात ९९ टक्के लोक बलात्कारी नाही आहेत, पण या ९९ टक्के लोकांची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. या ९९ टक्क्यांमधील महिला आपल्यावर बलात्कार तर होणार नाही ना. या भीतीखाली जगत असतात, तर पुरुष जे आहेत ते माझ्या आईवर, बहिणीवर अशा घटना घडणार नाहीत ना, या भीतीखाली जगत असतात. आपल्याला त्या भीतीबरोबर जगण्याची सवय झाली आहे, त्यामुळे विकृत विचारांच्या लोकांचा तो एक टक्काआपल्याला डोईजड होतो.

बाइकची ‘धूम’ प्रत्यक्षात कधीच करणार नाही!
‘धूम ३’च्या गप्पा मारता मारता आमिरला सिगारेटचे झुरके घेण्याची लहर आली खरी, पण त्यामुळे समोरच्यांच्या मनावर उमटलेले प्रश्नचिन्हही त्याने अचूक टिपले. धूम्रपानाची सवय मला नाही, पण कुठलाही चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी मी प्रचंड तणावात असतो. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधी महिनाभरासाठी सिगारेटची सवय लागते, पण माझी इच्छाशक्ती एकदम कडक आहे. चित्रपट प्रदर्शित झाला, की आपोआप सिगारेट विझते. अर्थात, हे सांगता-सांगताही आमिरच्या दोन सिगारेट शिलगावून झाल्या होत्या.  ‘धूम ३’मध्ये बाइक आणि त्याच्यावरचे स्टंट्स आहेत, पण प्रत्यक्षात मी बाइकपासून दूरच राहतो. लहानपणी शाळेसाठी बसथांब्यावर उभा होतो तेव्हा एक अपघात पाहिला होता. एका बाइकस्वाराला गाडीने धडक दिली आणि तो काही फूट दूर फेकला गेला होता. सुदैवाने तो वाचला, पण तेव्हापासून बाइक सुरक्षित नाही हे डोक्यात बसलं होतं. त्यामुळे चित्रपटात मी चालवतो, पण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की, आम्ही जे स्टंट्स करतो, त्यासाठी आम्ही प्रशिक्षण घेतलेलं असतं, सराव केलेला असतो. म्हणजे, शिकागोत ‘धूम ३’चे बाइक स्टंट करताना संपूर्ण एक रस्ता आमच्यासाठी राखीव ठेवलेला होता. सुरुवातीची काही दृश्ये करताना सुरक्षेची सगळी काळजी घेतली जाते आणि तुम्हाला सराव झाल्यानंतर मग पूर्ण दृश्य चित्रित होते. त्यामुळे ‘धूम’ बघताना मीही उत्साहित होतो, पण म्हणून उत्साहाच्या भरात कोणीही हे बाइक स्टंट करू नयेत, असं मी जाणीवपूर्वक सगळ्यांना सांगतो आहे.
आकडय़ांत रस नाही!
शंभर कोटी, दोनशे कोटी.. या आकडय़ांत मला रस नाही. मला जर आकडय़ांत रस असता तर मी ‘तलाश’सारखा चित्रपट केला नसता. ‘तलाश’मध्ये मला जी गोष्ट सर्वात जास्त आवडली ती म्हणजे तुमची एखादी गोष्ट हरवते तेव्हा तुमचं काय होतं, याची ती गोष्ट होती. तुमचं नातं, तुमची माणसं, काहीही असेल जेव्हा तुम्हाला सोडून जातात, तेव्हा तुमचं जे नुकसान होतं ती भावना पहिल्यांदा या चित्रपटात आली ते मला जास्त भावलं. ‘तलाश’ फार तर ७५ कोटींपर्यंत पोहोचेल संगीताचे हक्क, सॅटेलाइट हक्क अशी सगळी गणितं धरून.. असं मला वाटलं होतं. त्याने ९५ कोटी केल्यावर अरे वा! असं वाटलं. पण खरोखरच चित्रपटाची कथा काय हे महत्त्वाचं. कलेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी फार नंतर येतात, असे सांगणाऱ्या आमिरने ‘धूम ३’मधली साहिलची भूमिका ही आजवरच्या कारकिर्दीतील अतिशय आव्हानात्मक आणि अवघड भूमिका असल्याचे सांगितले. चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची पंचविशी साजरी करत असतानाच हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्याचे महत्त्वही आगळे असल्याचे आमिरने सांगितले.

पन्नाशीच्या उंबरठय़ावरचा देखणा अनुभव!
‘धूम ३’मध्ये जिम्नॅस्टची व्यक्तिरेखा करताना उंच हवेत केवळ एका दोऱ्याला लटकून नृत्य करणं असे सगळे प्रकार आपण आणि कतरिनानेही स्वत:च केले आहेत, असे सांगताना आमिरने या वयात कराव्या लागलेल्या करामतींचा मजेदार अनुभव सांगितला. दोऱ्यांवर लटकून गिरक्या घेताना तेही चाळीस फूट उंचीवर ती दृश्यं देताना मला चक्कर येत होती. तसं मी त्या प्रशिक्षण देणाऱ्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी प्रत्येकालाच तसं करताना चक्कर येते, असं सांगितलं. फक्त आम्हाला सतत ते करून करून शरीराला सवय होते. मी तिथल्या प्रशिक्षकाला तू हे प्रकार आमच्याबरोबर का करत नाहीस, असं विचारलं तेव्हा त्याने आपण तरुण होतो तेव्हा हे सगळं केलं आहे, आता ते दमवणारं आहे, असं सांगितल्यावर साहजिकच मी त्याचं वय विचारलं. त्याने ४५ वय आहे हे सांगितल्यावर अरे! तुझं वय ४५ आहे.. तू ते करत नाहीस आणि माझं वय ४८ आहे, तरीसुद्धा मला या कसरती करायला लावताय.. यावर तुझ्याकडे पाहून तुझं वय ४८ आहे असं वाटत नाही. आम्हाला वाटलं तुझं वय फार तर २५ असेल, असं देखणं उत्तर आमिरला मिळालं; पण खरं म्हणजे या उत्तरानंतर आमिरला बाकायदा डॉक्टरांकडून चक्कर न येण्याच्या गोळ्या देण्यात आल्या आणि मग ‘धूम ३’च्या कसरती पार पडल्या.

कलाकारालाही जबाबदारीची जाणीव हळूहळूच होते!
आज एक अभिनेता म्हणून मी वेगळा आहे. आता जर कुणी मला वीस वर्षांपूर्वीचं ‘खंबे जैसे खडी है.’ हे गाणं करायला सांगितलं तर ते मी अजिबात करणार नाही. कलाकारही माणूस असतो. माझ्यातही जबाबदारीची जाणीव फार उशिरा आली. अजूनही वेगवेगळे अनुभव येतात तेव्हाच विचार बदलत राहतात. ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटासंदर्भातला किस्सा सांगतो. त्या चित्रपटाचा निर्माता मीच होतो. यात एक दृश्य होतं की, काही तरुण पार्टीमध्ये असणाऱ्या नायिकेला छेडत असतात. मग तिथे इम्रान (नायक) येतो आणि नायिकेला सोडवण्यासाठी मारामारी न करता विनोदाचा वापर करतो. तो त्यांना असं घाबरवतो की, या तरुणीला एड्स झाला आहे, तर तुम्ही अजिबात तिच्या जवळ जाऊ नका आणि हे ऐकल्यावर ते सगळे तरुण मागे फिरतात. इम्रान नायिकेला सहीसलामत बाहेर काढतो. गमतीगमतीत ते दृश्य येतं, लोक हसतात, टाळ्या पिटतात; पण त्या चित्रपटानंतर मला एका मुलीनं पत्र पाठवलं होतं की, आमिर तुझ्याकडून या दृश्याची अपेक्षा आम्हाला नव्हती. माझ्या बहिणीला एड्स आहे आणि हे दृश्य पाहिल्यानंतर मला फार वाईट वाटलं की, एखाद्याला एड्स झाला, की समाजाने त्याला असं झिडकारून द्यावं. मजेतही हा प्रसंग चुकीचाच संदेश पोहोचवणारा आहे. त्या मुलीला मी माफी मागणारं पत्र लिहिलं, पण त्या क्षणी मला जाणीव झाली की, आपण या गोष्टीचा किती वरवर विचार केला होता.

चित्रपट जबाबदार कसे?
जे चित्रपटांना दोष देतात त्यांना हे सांगायचं आहे की, चित्रपट फार नंतर येतो. चित्रपटकर्मी म्हणून आमची जबाबदारी लोकांचे मनोरंजन करणे एवढीच आहे. पोलिसांची जबाबदारी आहे की, त्यांनी लोकांचं रक्षण करावं आणि न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे की, त्यांनी लोकांना न्याय मिळवून द्यावा. हे सगळं असं आदर्श असतानाही आपल्याकडे हजार घटनांपैकी केवळ एक तृतीयांश घटनांच्या एफआयआर नोंदवल्या जातात. मग इथे चित्रपटांचा संबंध येतोच कुठे? आपण चित्रपटच नाही आहेत, टीव्ही नाही आहे हे मानून चाललो तरी या घटना घडणार नाहीत, असे तुम्ही सांगू शकता का? पूर्वी चित्रपट नव्हते तेव्हाही या घटना घडत होत्या. त्यामुळे सिनेमामुळे असं होतं आहे असं सहज बोट दाखवणं पोलिसांसाठी सोपं काम आहे. मला तुम्हाला एकच लक्षात आणून द्यायचं आहे की, चित्रपटांचा प्रभाव समाजावर पडतो हे खरं आहे, पण हा प्रभाव हेच या घटनांमागचे मूळ कारण आहे असं तर तुम्हाला कोणीही सांगत असेल, तर ते फसवं आहे. पोलिसांनी मुळात अशा घटना नोंदवणं, पीडित महिलेल्या न्यायालयात कसे प्रश्न विचारले जावेत, याबाबत कायदेशीर नियम आहेत, पण प्रत्यक्षात परिस्थिती काय असते? त्यामुळे कोणाला तरी दोषी ठरवून आपलं समाधान करण्यात अर्थ नाही. लोकांनी पोलिसांना, न्यायव्यवस्थेला त्यांची जबाबदारी योग्य रीतीने का पार पाडली जात नाही, याचा जाब विचारला पाहिजे.

पुरुष-स्त्री असं कलाकारांमध्ये काही नसतं!
पुरुष कलाकारांना जास्त मानधन मिळते आणि महिला कलाकारांना कमी मिळते, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यांच्या मानधनाचे आकडे हे मार्केट ट्रेंडवर आधारित असतात. एखाद्या कलाकाराला स्वत:च्या नावावर प्रेक्षकांना थिएटपर्यंत खेचून आणण्याची ताकद आहे की नाही, यावर तुमची लोकप्रियता, मानधन सगळं ठरत. दोन पुरुष कलाकारांना तरी कुठे एकसमान मानधन मिळतं? एकाला कमी तर दुसऱ्याला जास्त मिळतं. खरं तर आपल्याकडे याआधी अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी काही दशकं आपलं स्थान टिकवून ठेवलं होतं. त्यामुळे एखादी अशी अभिनेत्री तयार होत नाही जी आपल्या अभिनयाच्या ताकदीने लोकांना आपल्याशी बांधून ठेवेल तोपर्यंत हे समीकरण तुटणार नाही.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त ( Ravivar-vruttant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan interview in loksatta

ताज्या बातम्या