वनाधिकारी सुजय डोडल यांच्या सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय
जागतिक वनदिनाचे औचित्य साधून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तब्बल २१९ वन मजूरांचा जनता अपघात विमा काढून वनदिनाची आगळीवेगळी भेट दिली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी व ताडोबाचे (कोअर) उपसंचालक सुजय डोडल यांच्या या सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
 आज २१ मार्च हा जागतिक वनदिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. या दिवशी वनखात्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पट्टेदार वाघाच्या वास्तव्याने जगातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातही यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, परंतु जागतिक वनदिनी ताडोबात काम करणाऱ्या मजूर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी ठोस कार्य करण्याची तीव्र इच्छा ताडोबाचे उपसंचालक सुजय डोडल यांच्या मनात होती. त्यांनी ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्याकडे ती बोलूनही दाखवली आणि ताडोबातील मजूरांचा अपघात विमा काढण्याची कल्पना डोडल यांनी मांडली. क्षेत्र संचालक तिवारी यांनी ती उचलून धरली. ताडोबा प्रकल्पात एकूण २१९ मजूर आहेत. ताडोबा प्रकल्प कोळसा, मोहुर्ली व ताडोबा अशा तीन वनपरिक्षेत्रात विभागला आहे. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये हे सर्व मजूर कामावर असतात. ताडोबाच्या प्रवेशव्दारापासून, तर पानवठे, सुरक्षा यंत्रणा, निसर्ग कुटी, विश्रामगृह यासोबतच प्रकल्पात वन मजुरीचे काम करतात. या सर्वाचा विमा एकाच वेळी उतरविण्यात आला आहे. त्यानुसार या सर्व २१९ मजूरांचे सर्व कागदपत्रे गोळा करण्याचे काम डोडल यांनी सुरू केले. यात त्यांना कार्यालयीन वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व कर्मचाऱ्यांनीही साथ दिली. आज जागतिक वनदिनी या सर्व मजूरांचा विमा काढून पॉलिसी त्यांच्या सुपूर्द करण्यात येणार आहे.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून हा एक लाखाचा अपघात विमा पाच वर्षांसाठी आहे. यासाठी विमा कंपनीला एका मजुरामागे २२८ रुपये हप्ता देण्यात येणार असून हा सर्व निधी ताडोबा-अंधारी टायगर कॉन्झर्वेशन फाऊंडेशनमधून देण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक सुजय डोडल यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. वनखात्यात अशाप्रकारचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. यात ताडोबातील सर्व वन मजूरांचा समावेश करण्यात आलेला आहे. भविष्यात ताडोबातील गाईड, जिप्सी चालक व इतरांचाही समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच वनदिनाचे औचित्य साधून कोळसा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वासेरा या गावातील २० कुटूंबांना एलपीजी गॅसचे वितरण केले जाणार आहे. सोबतच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘चला वाघांच्या साम्राज्यात’ या पुस्तकाचेही प्रकाशन केले जाणार आहे. निसर्ग अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार सुनील करकरे लिखित हे पुस्तक ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. उपसंचालक डोडल यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.