कुख्यात आरोपी पिंकू घोंगडे याच्या खून प्रकरणी अटकेतील अकरा आरोपींपैकी दोन मुख्य आरोपींना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली असून इतर नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
अटकेतील आरोपींना पोलिसांनी अतिरिक्त सहावे जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्यापुढे हजर केले. सरकारी व व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल जाहीर केला. सूमित रमेश चिंतलवार (रा. विश्वकर्मानगर), अमर उर्फ छोटू रमेश लोहकरे (रा. बजरंगनगर) या दोन आरोपींना न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ व १४९ अन्वये जन्मठेप, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावास, कलम १४७ मध्ये सहा महिने कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, कलम १४८ मध्ये एक वर्ष कारावास, साडेसातशे रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, शस्त्र कायद्याच्या कलम ४ (२५) अन्वये एक वर्षे कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास सुनावला. या सर्व शिक्षा या दोन्ही आरोपींना एकत्र भोगायच्या आहेत. कलम १२० (ब) मधून या दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका केली.
शुभम उर्फ बबलू मनोहर फुलझेले (रा. रामबाग), श्रीकांत उर्फ मामा चिंतामणी इंगोले (बजरंगनगर), अमर नामदेव धरमारे (रा. ज्ञानेश्वरनगर), प्रवीण उर्फ जॉन कालिंदी (रा. वसंतनगर), सॅबेस्टियन उर्फ शिब्बू राफेल अँथोनी (रा. इंदिरानगर), गीतेश रमेश सेलोकर (रा. जाटतरोडी), निशांत उर्फ गब्बर चंद्रकांत सहारे (रा. कुकडे लेआऊट), ललीत ऊर्फ लाली विलास ठाकरे (रा. विश्वकर्मानगर) व प्रवीण महादेव मुरारकर (रा. इमामवाडा) या नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. न्यायालयात अकरा जणांची साक्ष झाली. दोन साक्षीदार उलटले.
अवैध प्रवासी वाहतुकीमधील वैमनस्यातून एप्रिल २०११ मध्ये बबलू सहारे व राजू कांबळे या दोघांचे खून झाले. या दोन्ही प्रकरणात पिंकू मारोतराव घोंगडे हा आरोपी होता. तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठी आरोपी टपले होते. १० ऑगस्ट २०११ रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पिंकू जादूमहलकडून राजकमल चौकाकडे बुलेटने निघाला. एका मारेकऱ्याने पिंकूला आवाज दिला. कुणी आवाज दिला हे पाहण्यासाठी पिंटू थांबला. तेथे दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी चारही दिशेने पिंकूकडे धाव घेतली. त्यांच्या हातात शस्त्रे होती. त्याला गाडीवरून उतरण्याचीही संधी मारेकऱ्यांनी दिली नाही. क्षणात मारेकऱ्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. मोठय़ा दगडाने त्याचे डोके व चेहरा ठेचला. पिंकू रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. तो मरण पावला, असे समजून मारेकरी मोटारसायकलवर पळून गेले. पिंकूवर शस्त्राचे ४८ घाव होते. पोलिसांनी शोध घेऊन १२ ऑगस्ट २०११ रोजी आरोपींना अटक केली. यातील आणखी एक आरोपी नयन चिंतलवार याने कनिष्ठ न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. त्याला सरकार पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने हा जमीन रद्द केला. आरोपी नयन तेव्हापासून फरारच आहे.
आरोपींना सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. न्यायालय परिसरात आरोपींच्या अनेक समर्थकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीला परिसराबाहेर काढले. जिल्हा न्याय मंदिराच्या सातव्या मजल्यावरही मोठा बंदोबस्त होता. न्यायालयात सरकार पक्षातर्फे जिल्हा मुख्य सरकारी वकील विजय कोल्हे तर चंद्रशेखर जलतारे, चेतन ठाकूर, राम मासुरके व राजेश तिवारी या वकिलांनी आरोपींची बाजू मांडली.