टिटवाळा आणि डोंबिवली पश्चिम परिसरात सुमारे दोन हजारांहून अधिक नव्याने अनधिकृत चाळी, बंगले, आरसीसी पद्धतीच्या इमारतींची बांधकामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. ही अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश आयुक्त शंकर भिसे यांनी सोमवारी दिले.
मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत या दोन्ही विभागांतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आव्हान महापालिकेच्या पथकासमोर आहे. त्यानंतर कोळसेवाडी, काटेमानिवली, बाजारपेठ, रेतीबंदर, आयरे, भोपर भागांतील अनधिकृत चाळी, बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात मोहने, मांडा, टिटवाळा, आंबिवली, शहाड, बल्याणी भागांतील अनधिकृत बांधकामे तोडण्यात येणार आहेत. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ४० पोलिसांच्या बंदोबस्तात ही अनधिकृत बांधकामे तोडण्यात येणार आहेत. या कारवाईनंतर डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागातील मोठागाव, रेतीबंदर, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, गरिबाचापाडा, कुंभारखाणपाडा, नवापाडा भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा टाकण्यात येणार आहे. प्रभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने ही अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे नागरिकांनी केल्या आहेत. अ प्रभागाचे रमेश गायकवाड, ह प्रभागाचे लहू वाघमारे ही बांधकामे किती प्रभावीपणे पाडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आयुक्तांकडून कानउघाडणी
अधिकाऱ्याने अनधिकृत बांधकामांची पाठराखण केली तर त्याला निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन मिळणार नाही, असा सज्जड दम आयुक्त भिसे यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. उच्च न्यायालयातील याचिका, लोकायुक्तांकडून आलेल्या अनधिकृत बांधकामांविषयीच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिले.  प्रत्येक प्रभागात नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहू नयेत म्हणून उपअभियंता दर्जाचा एक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. मालमत्ता, कर, पाणी विभागाने या अनधिकृत बांधकामांना कोणतेही संरक्षण देऊ नये असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.