रस्त्यांवरील अपघात टाळण्याचा एक प्रयत्न म्हणून येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अलीकडेच राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत योग्यता प्रमाणपत्र नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या २२६ वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एक ते ३१ ऑगस्ट या कालावधीत खासगी प्रवासी बसेस तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. परिवहन विभागाने ठरावीक कालावधीसाठीच ही मोहीम न राबविता कायमस्वरूपी वाहन तपासणीची मोहीम सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उच्च न्यायाालयाने १० जून रोजी दिलेल्या आदेशानुसार परिवहन आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे विधिग्राह्य़ योग्यता प्रमाणपत्राशिवाय चालविल्या जाणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.  
योग्यता प्रमाणपत्र नसतानाही बहुसंख्य वाहने रस्त्यावर धावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाईसाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत सुमारे १५०० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील दोषी २२६ वाहनधारकांकडून आतापर्यंत एक लाख २४ हजार ४०० रुपये इतका न्यायालयीन दंड व तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. ७४ वाहने अटकवून ठेवण्यात आली आहेत. योग्यता प्रमाणपत्राविना वाहने रस्त्यावर धावत असल्याचे तपासणीत आढळून आल्यास वाहनधारकाविरुद्ध दंडात्मक कारवाईसह वाहन ताब्यात घेणे, वाहनाच्या रस्त्यावरील वापरास प्रतिबंध करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी तातडीने करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
याशिवाय खासगी प्रवासी बसेसना होणारे अपघात लक्षात घेऊन एक ते ३१ ऑगस्ट या कालावधीत खासगी प्रवासी बसेस तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेत बसेसची रस्ता सुरक्षा दृष्टिकोनातून तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत आणीबाणीप्रसंगी बाहेर पडावयाचा दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, वाहनांच्या शयनिका तसेच आसनांची संख्या, गाडीच्या मागील बाजूचा दिवा, रिफ्लेक्टर यांची विशेषत: तपासणी करण्यात येणार आहे. सर्व बसधारकांनी आपली वाहने तांत्रिकदृष्टय़ा योग्य आणि सर्व कागदपत्रे विधिग्राह्य़ असल्याची खात्री केल्यानंतरच रस्त्यावर चालवावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.