महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कामगार सफाईचे काम न करता दुसऱ्या विभागात कार्यरत आहेत, तर काही स्वच्छता कर्मचारी महापालिकेशिवाय अन्य ठिकाणी काम करीत आहेत. काही कामगार सफाईचे कामच करीत नाहीत, या बाबी नोव्हेंबरअखेर घेतलेल्या ओळख परेडमधून पुढे येताच महापालिकेने वेगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या. कामचुकार सफाई कामगारांवर आयुक्त सुधीर शंभरकर यांनी स्वच्छता निरीक्षक यांच्यावर नोटिसा बजावून वेतनवाढ का रोखू नये, याबाबत तीन दिवसांत खुलासा मागविला.
परभणी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षांमध्ये वाढ झाली. परंतु महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येत नव्हते. त्यामुळे शंभरकर यांनी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेतली.
२९ नोव्हेंबरला स्वच्छता कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेतली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या. स्वच्छता विभागातील बरेच कर्मचारी सफाईचे काम न करता दुसऱ्या विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.
काही कर्मचारी महापालिकेची नोकरी केवळ कागदोपत्री करीत असून, प्रत्यक्षात कुठल्या ना कुठल्या नेत्यांकडे सेवेत आहेत. काही कर्मचारी तर स्वच्छतेचे कामच करीत नाहीत. केवळ पगार उचलतात.
काही कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी बदली कामगार ठेवले आहेत, अशा अनेक बाबी ओळख परेडमधून पुढे आल्या. या सर्व बाबींकडे स्वच्छता निरीक्षकांचे कायमच दुर्लक्ष झाले. किंबहुना त्यांच्या दुर्लक्षामुळेच सफाई कामगारांक डे कोणाचीही करडी नजर नव्हती. आता स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी सफाईचेच काम केले पाहिजे, असा दंडक आयुक्त शंभरकर यांनी घातला आहे. तसा अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत स्वच्छता निरीक्षकांना आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास वेतनवाढ थांबविण्यात येईल, असे बजावले आहे.
दरम्यान, आयुक्तांनी दिलेल्या या नोटिसा स्वच्छता निरीक्षक कितपत गांभार्याने घेतात याकडे लक्ष लागले असून, महापालिकेची कर्मचारी व अधिकाऱ्यांची यंत्रणा किती जबाबदारीने भविष्यात काम करते, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.