स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून लौकिक असलेल्या कराड तालुक्यातील तांबवे येथे बेंदूर सणादिवशी बैलांच्या मिरवणुकीत परजिल्ह्यातील नर्तिकांची छमछम आणि त्यावर बेधुंद नाचणाऱ्यांनी केलेली नोटांची उधळण जोरदार चर्चेत राहिली. याप्रकरणी तांबवे येथील बैलजोडींच्या तीन मालकांवर कराड ग्रामीण पोलिसांनी मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई केली.
अशोक शिवाजी भोसले (वय ५५), धनाजी निवृत्ती यादव (वय ३५) व संतोष नवनाथ राऊत (वय ३६ तिघे रा. तांबवे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की तांबवे (ता. कराड) येथे बेंदूर सणादिवशी बैलांची मिरवणूक काढण्यात आली. या शर्यतीच्या बैलांच्या सवाद्य मिरवणुकीत नर्तिकांनाही नाचवण्यात आले होते. नर्तिकांच्या नाचावर बेधुंद नाचत काही तरुणांकडून पैशाचीही उधळण करण्यात आल्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. या घटनेची दखल घेत ग्रामीण पोलिस ठाण्याचे जमादार संतोष कोळी यांनी संबंधित मिरवणुकीचे आयोजन करणाऱ्या तिघांवर कारवाई केली.