ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी पदभार स्वीकारताच सोमवारपासून शहरातील राजकीय पक्षांच्या अनधिकृत फलकांविरोधात कारवाई सुरू केली असून वॉर्ड स्तरावर देण्यात आलेल्या फलकांच्या परवानग्याही रद्द केल्या आहेत. तसेच अनधिकृत फलक न उतरविणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या शिवसेना-मनसे या पक्षांना चांगलाच धक्का बसला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना-मनसे उमेदवारांच्या अनधिकृत फलकांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त शंकर भिसे यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. असे असतानाच नवे प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्या कारवाईमुळे त्यास दुजोरा मिळू लागला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत राजकीय पक्षांनी मोठमोठे फलक लावले असून विद्युत खांब, रस्त्याच्या दुतर्फा, महत्त्वाचे चौक, असे सर्वत्र जागोजागी फलक लावण्यात आले आहेत. या फलकांमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असतानाही त्याकडे महापालिका आयुक्त भिसे यांचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसून येत होते. दरम्यान, गेल्या आठवडय़ात कल्याण लोकसभेचे निवडणूक निरीक्षक आशिष वाच्छानी यांनी कल्याण-डोंबिवली शहरांचा दौरा केला होता. त्यामध्ये उमेदवारांनी बेसुमार अनधिकृत प्रचार फलक लावल्याचे त्यांना दिसून आले होते. या प्रकरणी त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामुळेच भिसे यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. भिसे यांच्या जागी आलेले नवे प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी शहरातील अनधिकृत फलकांविरोधात कारवाई सुरू केल्याचे बोलले जात आहे. महापालिकेचे सात वॉर्ड असून तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर फलकांना परवानगी देऊ केली होती. मात्र, या सर्व परवानग्या रद्द करण्याचे आदेश पाटील यांनी दिले असून मालमत्ता विभागाने दिलेल्या परवानग्या कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील अनधिकृत फलक उतरविण्याची कारवाई सुरू केली आहे.