‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘रानभूल’, ‘गैर’ आणि ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटांमध्ये आणि ‘कालाय तस्मै नम:’, ‘एकाच या जन्मी’, ‘घर श्रीमंताचं’ अशा टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचणाऱ्या तेजस्विनी पंडित ही गोंदियाची सून झाली आहे. गोंदियाच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील पोवार समाजातील संगणक अभियंता भूषण बोपचे याच्यासोबत तिचा विवाह रविवारी, १६ डिसेंबरला मयूर लॉन्सवर पार पडला. त्यांचा हा विवाह गोंदियात होत असताना त्याची किंचितही कुणकुण कुणाला नव्हती. या बाबतीत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती, असे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेले भूषणचे वडील रामेश्वर बोपचे यांनी सांगितले. हा विवाह गोंदियावासीयांसाठीच नाही तर वैदर्भीयांसाठी कुतूहलाचा विषय झाला आहे. दहा वर्षांपूर्वी पुण्यात दोघांची भेट झाली आणि नंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीतून एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले. दोघांसमोरही आपापल्या करिअरचा प्रश्न होता. शेवटी अनेक अडचणींवर मात करीत आपापल्या क्षेत्रात नाव कमावले. तेजस्विनीला ‘मी सिंधूताई सपकाळ’ मधील भूमिकामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला. त्याचबरोबर भूषण यानेही अमेरिकन कंपनीच्या पुणे कार्यालयात मानाचे स्थान मिळवले. अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावणारी तेजस्विनी ही रणजित पंडित आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या आहे. तर भूषण बोपचे हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. दोघांचीही क्षेत्रे अतिशय वेगळी आहेत. गेल्या दहा वर्षांची प्रेमकहाणी त्यांनी आपली विवाहबंधनात गुंफली.