दुष्काळग्रस्त भागात झालेल्या जलसंधारणाच्या कामांचे राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सोमवारी कौतुक केले.
औरंगाबाद जिल्हय़ातील चित्तेपिंपळगाव येथे चित्ती नाल्यावर शिरपूर पॅटर्ननुसार बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी त्यांनी केली. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. टंचाईच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी मोसंबीची बाग वाचवली, तसेच प्लॅस्टिकचे आच्छादन केले, अशा शेतकऱ्यांशी बांठिया यांनी या वेळी संवाद साधला. आडगाव जावळे येथील गुणवंत चंद्रभान गवई यांच्या मोसंबी बागेस त्यांनी भेट दिली. पैठण तालुक्यातील पाचोड येथील ज्ञानांकुर अंगणवाडीसही त्यांनी भेट दिली. एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी उषा मोरे व कर्मचाऱ्यांशी बांठिया यांनी संवाद साधला.