ठाणे आणि कळवा या दोन शहरांना जोडणारा नवा खाडीपूल उभारण्याच्या प्रकल्पाला उशिरा का होईना मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून हा खाडीपूल नेमका कसा उभारावा हे ठरविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. कळव्याचा सध्याचा खाडीपूल हा ब्रिटिशकालीन असून वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी नव्या पुलाची उभारणी करणे गरजेचे आहे. वर्षभरापूर्वी सादर झालेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात नव्या पुलाची योजना मांडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हा पूल अर्थसंकल्पापुरताच मर्यादित राहतो काय, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर पुलाच्या उभारणीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून स्थायी समितीने त्यास हिरवा कंदील दाखविल्याने कळवा खाडीपुलावर नवा पूल उभारला जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन प्रमुख शहरांचा समावेश होतो. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्ग, कळवा, खारीगाव आणि मुंब्य्रातून ठाण्याकडे येण्यासाठी कळवा खाडीपूल हा खुष्कीचा मार्ग समजला जातो. या खाडीपुलावरून दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची ये-जा असते. ठाणे आणि कळव्याला जोडणारे सध्या दोन खाडीपूल अस्तित्वात असून त्यापैकी एक अतिशय रुंद आहे. अवघ्या एका मार्गीकेचा असलेल्या या पुलाचा वापर दुचाकी तसेच रिक्षा वाहतुकीसाठी होत असतो. दुसऱ्या खाडीपुलाची अवस्था जर्जर असून वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता खाडीवर आणखी एक पूल उभारणे ही काळाची गरज आहे. गेली अनेक वर्षे या नव्या खाडीपुलाची चर्चा सुरू आहे. मात्र, नव्या पुलाची रचना प्रत्यक्षात कागदावरही उतरत नव्हती. आर. ए. राजीव यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार असताना त्यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नव्या खाडीपुलासाठी तरतूद केली. राजीव यांच्या अर्थसंकल्पात कळवा परिसरातील वेगवेगळ्या योजनांचा समावेश होता. त्यापैकी खाडीपूल हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जात होता.
प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची चिन्हे
अर्थसंकल्पात नव्या खाडीपुलासाठी तरतूद केल्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी येणार, अशी चर्चा सुरू झाली होती. विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांनी या पुलाची गरज ओळखून प्रकल्पाचा आराखडा नेमका कसा असावा यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कळव्याच्या खाडीत मोठय़ा प्रमाणावर खारफुटींची निर्मिती झाली आहे. त्यामुळे नव्या खाडीपुलाची उभारणी करताना खारफुटींची कत्तल करावी लागणार आहे. नवी मुंबईत सिडकोचे अनेक उड्डाणपुलांचे प्रकल्प खारफुटींमुळे रखडले आहेत. त्यामुळे कळवा खाडीपुलाची उभारणी करताना खारफुट्टींचा धक्का लागणार नाही, याची दक्षता महापालिकेस घ्यावी लागणार आहे. या सर्वाचा अभ्यास करण्यासाठी तसेच उड्डाणपुलाचे अंदाजपत्रक पक्के करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जात आहे, अशी माहिती आयुक्त असीम गुप्ता यांनी पत्रकारांना दिली. नव्या पुलाची उभारणी जुना पूल पाडून करायची किंवा त्या शेजारी करायची याचा अभ्यासही हा आराखडा तयार करताना केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
कळवा खाडीपुलासाठी सल्लागाराची नियुक्ती
ठाणे आणि कळवा या दोन शहरांना जोडणारा नवा खाडीपूल उभारण्याच्या प्रकल्पाला उशिरा का होईना मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून हा खाडीपूल नेमका
First published on: 29-01-2014 at 08:26 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adviser oppointed for kalva bay bridge