सहकारी डॉक्टरच्या आकस्मिक निधनानंतर सर्व निवासी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन देऊ केलेला एक दिवसाचा पगार वर्ष उलटल्यावरही संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. राज्यभरातील ११ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिलेला निधी कुटुंबापर्यंत पोहोचला असला तरी मुंबईतील महानगरपालिकेच्या केईएम, नायर व सायन रुग्णालयांकडून याबाबत उदासीनता दाखवली जात आहे.सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षांला असलेल्या किरण जाधव यांनी गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी वैयक्तिक कारणाने आत्महत्या केली. त्यांच्या घरातील स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सहकारी निवासी डॉक्टरांनी स्वत:चे एक दिवसाचे वेतन त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचे ठरवले. राज्याच्या निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने त्यांच्या सर्व सभासदांना एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला सर्वानीच पािठबा दिला. त्यासंबंधीचे पत्र मार्डकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला देण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारच्या अकरा वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे २३ ऑगस्ट २०१४ रोजीचे वेतन गोळा करून २५ लाख रुपयांचा निधी किरण जाधव यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला. मात्र महानगरपालिकेच्या केईएम, नायर आणि सायन या रुग्णालयातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचा निधी वर्ष उलटून गेल्यावरही संबंधित कुटुंबाकडे पोहोचलेला नाही.किरण जाधव यांच्या कुटुंबाची आíथक स्थिती कोलमडलेली आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी निवासी डॉक्टर पुढे आले होते. मात्र निवासी डॉक्टरांनी केलेली मदत अजूनही पालिकेकडून कुटुंबीयांना दिली गेलेली नाही. ही मदत सुमारे वीस लाख रुपये आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केल्यावर केवळ तांत्रिक कारण पुढे केले जाते, अशी माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली. याबाबत गेल्या वर्षी २३ ऑगस्टपासून मार्डकडून सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. या तीनही महाविद्यालयांकडून दोन महिन्यांपूर्वी हा निधी देण्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही पालिकेच्या लेखा विभागाकडून धनादेश काढण्यात आलेला नाही. किमान वर्षांच्या आत तो निधी कुटुंबाला मिळावा यासाठी मार्डकडून १० ऑगस्ट रोजी प्रमुख रुग्णालयांच्या संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांना विनंतीपत्र देण्यात आले. लेखा विभागाकडून याबाबत कार्यवाही का झाली नाही याचा आढावा घेऊन त्यासंबंधी तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. नागदा यांनी लोकसत्ताला सांगितले.