उरण तालुक्यातील उरण एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने या वर्षी जाहीर केलेल्या शाळेच्या फी वाढीला पालक संघटनेने विरोध केला आहे. या विरोधात सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक संघटनेने शाळेच्या प्रवेशद्वारावर सभा घेत व्यवस्थापनाने वाढीव फी मागे घ्यावी अशी जोरदार मागणी केली. या मागणीची दखल घेत शाळा व्यवस्थापनाने दोन दिवसांची मुदत मागितली असल्याचे संघटनेने सांगितले. या दोन दिवसात सकारात्मक उत्तर नाही आल्यास पुढील दिशा ठरविण्यात येईल, असा निर्णय पालक संघटनेने यावेळी घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण शहरात उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत व्यवस्थापनाने या वर्षीपासून सुमारे ५०० रुपयांची भरमसाट फी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात पालकांनी संघटित होऊन या फी वाढीला जाहीर विरोध करत वाढीव फी भरू नये असे आवाहन पालकांनी  केले  होते. या संदर्भात पालक संघटना तसेच शाळा व्यवस्थापनात चर्चाही झाली होती. मात्र तोडगा न निघाल्याने पालकांनी विरोध तीव्र करीत शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच सभा घेतली आणि फी वाढ मागे घेण्याची जोरदार मागणी केली. यावेळी पालक संघटनेचे प्रवीण पुरो यांनी शाळेने वाढविलेल्या फीचा निषेध नोंदवीत अशी फी वाढ केल्यास सर्वसामान्यांच्या मुलांना शाळेत शिक्षण घेणे शक्य होणार नाही.  शाळेला खर्चाच्या आधारावर फी वाढ देण्यास आमची हरकत नाही, मात्र शाळेने पालकांना विश्वासात घेऊन फी वाढ करावी अशी आमची भूमिका आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

या संदर्भात उरण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र भानुशाली यांनी पालक संघटनेला वारंवार निमंत्रित करूनही चर्चेला न आल्याने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या संदर्भात येत्या दोन दिवसात पालकांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation in the first day of school in uran
First published on: 16-06-2015 at 02:41 IST