कांदा पेटला..

कांदा भावावरून आंदोलनाचे सत्र सुरूच असून गुरूवारी प्रति क्विंटलचे भाव २०० ते ८०० रुपयांपर्यंत गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा ठिकठिकाणी उद्रेक झाला.

कांदा भावावरून आंदोलनाचे सत्र सुरूच असून गुरूवारी प्रति क्विंटलचे भाव २०० ते ८०० रुपयांपर्यंत गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा ठिकठिकाणी उद्रेक झाला. चांदवड, देवळा, उमराणे व कळवण येथे रास्ता रोको करत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कांद्याचे निर्यात मूल्य कमी केले जात नाही तो पर्यंत घसरण थांबणार नाही. त्यामुळे केंद्र शासनाने या संदर्भात त्वरित निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादक देशोधडीला लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील महिनाभरापासून कांदा दरात प्रचंड घसरण सुरू असली तरी केंद्र व राज्य शासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडल्यानंतर केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य ११५० डॉलपर्यंत नेवून निर्यात होणार नाही याची दक्षता घेतली. तथापि, हे भाव गडगडल्यानंतर केंद्र शासन गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्यावरून आधी लासलगाव, पिंपळगाव, मनमाड आदी ठिकाणी लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांनी आंदोलने केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कांद्याला ३० रुपये प्रतिकिलो भाव जाहीर करण्याची मागणी केली. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने निर्यात मूल्य ३०० डॉलरने कमी केल्याचे सांगण्यात आले. तथापि, यामुळे कांद्याचे गडगडणारे भाव काही थांबू शकले नाही. उलट मागील दोन ते तीन दिवसात त्यात ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे. गुरूवारी सकाळी हे भाव घसरल्यानंतर कळवण, चांदवड, उमराणे, कळवण व देवळा येथे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला.
चांदवड बाजार समितीत सकाळी कांद्याला सरासरी ७०० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला. यामुळे शेतकरी संतप्त झाले.
काँग्रसचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंभार्डे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर धाव घेऊन वाहतूक बंद पाडली. या भावात उत्पादन खर्च भरून निघणेही अवघड आहे, अशी तक्रार आंदोलकांनी केली. देवळा येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून कांद्याला किमान २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी मागणी केली. या बाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार आशा गांगुर्डे यांना दिले. या बाजार समितीत ३०० ते ८०० रुपये भाव पुकारण्यात आला होता. बुधवारी असणाऱ्या भावात निम्म्याने घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारासमोर अचानक रास्ता रोको सुरू केला. यामुळे देवळा-कळवण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.
उमराणे उप बाजारातही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. बुधवारी या बाजारात ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान भाव होते. गुरूवारी हेच भाव २०० ते ८०० रुपये जाहीर करण्यात आले. यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धाव घेऊन वाहतूक बंद पाडली. अर्धा तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. तहसीलदारांनी मध्यस्ती केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. कळवण व चांदवड येथेही याच स्वरुपाची आंदोलने झाली. कांद्याची खरेदी दर्जा पाहून केली जात आहे. त्यानुसार भाव दिले जातात. चांदवड बाजार समितीत ८०० ते १२०० रुपयांनी खरेदी झाली. पण, व्यापाऱ्यांना बदनाम करण्यासाठी हे भाव त्यापेक्षा खाली गेल्याची ओरड केली जात असल्याची भावना व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Agitation on onion price

ताज्या बातम्या